शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : रशिया, जर्मनीसह विविध देशांमध्ये करोनाने पुन्हा डोके वर काढले असून, भारतात फेब्रुवारी- मार्चदरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मात्र, करोनाचा संभाव्य उत्परिवर्तित विषाणू घातक नसेल तर तिसरी लाट फारशी तीव्र नसेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

जर्मनी, रशियातील प्रादुर्भाव वाढण्यास प्रामुख्याने करोनाचे ‘डेल्टा’ हे उत्परिवर्तन कारणीभूत ठरले आहे. भारतात ‘डेल्टा’चा उगम झाला. देशात दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढण्यास ‘डेल्टा’च कारणीभूत होता. आता देशातील नागरिकांमध्ये ‘डेल्टा’विरोधात बऱ्यापैकी प्रतिकारशक्ती निर्माण झाली असून, लसीकरणाचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे भविष्यात करोनाचे उत्परिवर्तन झाले तरी ते घातक नसेल तर तिसरी लाट सौम्य असेल. तसेच करोनाचे उत्परिवर्तन होण्याचा वेग कमी झाला असून, गेल्या काही महिन्यांत नवे उत्परिवर्तन आढळलेले नाही. त्यामुळे ‘डेल्टा’ इतके घातक उत्परिवर्तन निर्माण होण्याची शक्यता कमी आहे, परंतु होणारच नाही असे ठामपणे सांगता येणार नाही, असे मत साथरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश डोके यांनी व्यक्त केले.

गेल्या दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेतला तर युरोपमध्ये डिसेंबरदरम्यान करोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याचे आढळते. त्यानंतर दोन ते तीन महिन्यांत म्हणजेच फेब्रुवारी- मार्चमध्ये आपल्याकडे प्रादुर्भाव वाढायला सुरुवात होते. यंदा ऑगस्टपासून जवळपास सर्व र्निबध टप्प्याटप्प्याने शिथिल (पान २ वर) (पान १ वरून) करण्यात आले असले तरी करोनाचा प्रादुर्भाव फारसा वाढलेला नाही. मृतांचे प्रमाणही हळूहळू कमी होत आले आहे. त्यामुळे आता तिसरी लाट आली तरी फेब्रुवारी- मार्चमध्येच येईल. परंतु, ती सौम्य प्रमाणात असेल, असे मत मृत्यू विश्लेषण समिताचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.

प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे

गेल्या वर्षी याच काळात करोनाची पहिली लाट ओसरली होती, परंतु करोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी होता. करोनाची साथ संपल्याचा गैरसमज करून नागरिकांनी प्रतिबंधाचे सर्व नियम धुडकावून लावले होते. परिणामी करोनाचे उत्परितर्वन झाले. ‘डेल्टा’ने फेब्रुवारीपासून पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आणि आपल्याला दुसऱ्या लाटेला तोंड द्यावे लागले. गेल्या वर्षी ज्या चुका आपण केल्या त्याच आपण पुन्हा यावर्षी करत आहोत. राज्यात दुसरी लाट ओसरली असली तरी मुंबईत दररोज सुमारे तीनशे रुग्ण आढळत आहेत, तर राज्यात हे प्रमाण सुमारे एक हजार आहे. त्यामुळे करोनाची साथ पूर्णत: संपलेली नाही. वातावरणात अजूनही विषाणू आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन, चाचण्या, निदान यावर भर न दिल्यास करोनाच्या नव्या उत्परिवर्तनाची शक्यता नाकारता येत नाही, असे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

विषाणू परावर्तन केव्हा होते?

विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला तरी वातावरणात त्याचे अंश असतात. विषाणूविरोधात नागरिकांमध्ये तयार झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे विषाणूची ताकद कमकुवत व्हायला सुरुवात होते, अशावेळी अधिक तीव्रतेने रोगप्रतिकारक शक्तीविरोधात लढण्यासाठी विषाणू स्वत:च्या रूपामध्ये बदल करून अधिक शक्तिशाली बनतात. यालाच विषाणूचे उत्परिवर्तन म्हणतात. जितका काळ विषाणू अधिक संख्येने वातावरणात राहील तितके त्याचे परावर्तन होण्याची शक्यता अधिक असते.

चाचण्या, लसीकरणावर भर आवश्यक : डॉ. जोशी

गेल्या काही दिवसांत करोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी रुग्णांचे वेळेत निदान करून संसर्ग साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करणे आवश्यक असल्याचे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. मात्र, नागरिकांनी करोना साथ संपल्याच्या भ्रमात राहून लसमात्रा घेणे टाळू नये, असे आवाहन डॉ. जोशी यांनी केले.

मुंबईत २६५ नवे रुग्ण

मुंबई : शहरात करोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असून, रविवारी २६५ नव्या रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात २ रुग्णांचा मृत्यू झाला, तर २५९ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले. राज्यात दिवसभरात ९५६ रुग्ण आढळले, तर १८ जणांचा मृत्यू झाला.