मुंबई :- आगामी बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गोतस्करी आणि जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. गायांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर बुलडोझर कारवाईसह कडक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे पत्रक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जारी केले आहे.
राज्य परिवहन विभागाने राज्यभर विशेष तपास मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. २५ मे ते २८ मे दरम्यान विभागीय परिवहन अधिकारी, उपविभागीय परिवहन अधिकारी, सीमा तपासणी नाके आणि वाहतूक यंत्रणेला युद्धपातळीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.राज्यात गायीला ‘राज्यमाता’चा दर्जा देण्यात आला आहे. हिंदू समाजासाठी गाय ही श्रद्धा आणि संस्कृतीचा विषय असल्याने तिची हत्या किंवा अवैध वाहतूक सहन केली जाणार नाही, अशी माहिती सरनाईकांकडून देण्यात आली आहे.
वाहने जप्त होणार
राज्यात गोतस्करीचे प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. जनावरांना उपाशी ठेवणे, अमानुष पद्धतीने वाहनांमध्ये कोंबून नेणे आणि अवैध कत्तलखान्यांकडे पुरवठा करणे असे प्रकार रोखण्यासाठी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.त्यामुळे दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नसून थेट वाहने जप्त केली जाणार आहे.
