मुंबई : भोंदू बाबा अशोक खरातच्या बुवाबाजीत राज्यातील ३९ आमदार अडकल्याचा आरोप होत आहेत. बुवाबाजीत अडकलेल्या सर्व आमदारांची यादी राज्य सरकारने तातडीने जाहीर करावी, तसेच या आमदारांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीने केली आहे. या आमदारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोमवारी राज्यभरात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
निवडून गेलेले लोकप्रतिनिधी घटनात्मक पदावर असतात. घटनेने त्यांच्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारण्याची व तो जनतेत रुजवण्याची जबाबदारी दिली आहे. ही घटनात्मक जबाबदारी पार न पाडता, या उलट वर्तन करणे म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून घटनेने टाकलेली जबाबदारी पार न पाडणे आहे. अशा लोकप्रतिनिधींच्या निमित्ताने तंत्र – मंत्र, जादू – टोणा इत्यादी अंधश्रद्धेच्या गोष्टींना राजमान्यता मिळत असते. त्यामुळे सामान्य जनताही अशा भोंदू बाबांच्या भोंदूगिरीला बळी पडते.
भोंदू बाबा जितके गुन्हेगार आहेत, तितकेच गुन्हेगार त्यांना समर्थन देणारे, शरण जाणारे व आपल्या अनुयायांना बुवा – बाबांवर विश्वास ठेवण्याचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष दिशानिर्देश करणारे लोकप्रतिनिधीही गुन्हेगार आहेत, अशा गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
समाज माध्यमांतील चित्रफिती हटवा
भोंदू बाबा अशोक खरात याच्या शोषणाला बळी पडलेल्या अनेक महिलांच्या आश्लील चित्रफिती मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर फिरत आहेत. त्यामुळे बळी पडलेल्या महिलांच्या सामाजिक प्रतिष्ठेला ठेच पोहोचली आहे, असे चित्रफिती समाज माध्यमांतून तातडीने हटविण्याची कारवाई राज्य सरकारने करावी, अशी मागणीही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
भोंदू बाबांच्या विरोधात मोहीम राबवा
खरात बरोबरच राज्यातील अनेक गावांमध्ये भोंदू बाबांचे उदंड पीक आले आहे. राज्यकर्त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवादाचा पाठपुरावा करण्याऐवजी जाती आणि धर्म आधारित द्वेषवादी, अंधश्रद्ध राजकारणाला बळ दिल्याचा हा परिणाम आहे. राज्य सरकारने राज्यातील या सर्व भोंदू बाबांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना करावा. जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम कठोर करून अंमलबजावणी करावी. समाज माध्यमांतून होणाऱ्या बाबा – बुवा, ज्योतिषी, मंत्र – तंत्र, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींचे नियमन करणारी स्वतंत्र यंत्रणा तातडीने तयार करा, आदी मागण्याही माकपच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
