मुंबई : वडाळा येथील एका गृहनिर्माण प्रकल्पात ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एक कोटींची लाच मागणाऱ्या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह पाच जणांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. यामध्ये संबंधित कार्यकारी अभियंत्याचा नातेवाईक तसेच बांधकाम कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
वडाळा येथील एका भूखंडावर रिअल इस्टेट समूहाला बांधकाम प्रकल्प राबवायचा होता; या जमिनीवर केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही हक्क किंवा दावा नाही, असे दर्शवणारे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. असे प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित कार्यकारी अभियंत्याने आपल्या नातेवाईकामार्फत एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती आणि नंतर त्यात तडजोड करुन ती रक्कम ७० लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली. या प्रकरणी सीबीआयने गुरुवारी या प्रकरणी माहिती मिळताच केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुंबईचे कार्यकारी अभियंता, त्यांचे पुण्यातील रहिवासी असलेले नातेवाईक, रिअल इस्टेट समूहाचे उपाध्यक्ष आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. सीबीआयने गुरुवारीच सापळा रचला आणि आरोपी लोकसेवकाच्या नातेवाईकाला ५० लाख रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले. त्याने ही रक्कम कार्यकारी अभियंत्याच्या वतीने रिअल इस्टेट समूहाच्या उपाध्यक्षाकडून स्वीकारली होती.
लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी वाट पाहत असलेल्या कार्यकारी अभियंत्याला नवी मुंबईतील वाशी येथे ताब्यात घेण्यात आले. या व्यवहारादरम्यान उपस्थित असलेले रिअल इस्टेट समूहाचे व्यवस्थापक आणि ना हरकत प्रमाणपत्र मिळवू पाहणाऱ्या फर्मचे भागीदार यांनाही अटक करण्यात आली. अशा प्रकारे सर्व पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, ५० लाख रुपयांची लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे. ५० लाख रुपयांच्या मोबदल्यात पत्रव्यवहार नोंदवहीत कोणतीही नोंद न करता हे प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते आणि उर्वरित २० लाख रुपये एका आठवड्यानंतर दिले जाणार होते.
सीबीआयने कार्यकारी अभियंत्याच्या मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील नातेवाईक व सहकाऱ्यांच्या घर तसेच कार्यालयात झडती घेण्यात आली. या कारवाईत सुमारे ५३.८७ लाख रुपयांची रोख रक्कम (५० लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेव्यतिरिक्त), स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर दस्तऐवज हस्तगत करण्यात आले. लाच स्वीकारल्याप्रकरणी खासगी व्यक्तीला अटक होत होती. आता सीबीआयने लाच देणाऱ्या व्यक्तींनाही अटक केली आहे. याआधी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवी दिल्ली येथील कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता तसेच खासगी व्यक्तीला कंत्राटदाराकडून सहा लाखांची लाच घेताना पकडले होते. त्यांच्याकडून ५५ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली होती.
