दोन ठिकाणी रूळाला तडा गेल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

अखेर ११.४०ला वाहतूक सुरू झाली. तरीही मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल ३५ ते ४० मिनिटे उशिराने सुरू होती.

प्रतिकात्मक छायाचित्र.

ऐन मतदानाच्या दिवशीही बिघाडाची परंपरा कायम

ऐन मतदानाच्या दिवशी मतदार यादीतून आपली नावे गायब झाल्याने मतदारांच्या उत्साहाला तडा गेला असतानाच मंगळवारी सकाळी मध्य रेल्वेमार्गावर दोन ठिकाणी रुळांना तडा गेल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळी सहाच्या सुमारास दिवा व मुंब्रा यांदरम्यान रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. रुळ दुरुस्त होऊन सेवा पूर्ववत होत नाही तोच सकाळी १०.५०च्या सुमारास आसनगावजवळ अप मार्गावर रूळ तुटला. त्यामुळे वाहतूक ५० मिनिटे खोळंबली. अखेर ११.४०ला वाहतूक सुरू झाली. तरीही मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल ३५ ते ४० मिनिटे उशिराने सुरू होती.

मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास रुळांवर गस्त घालणाऱ्या गँगमनला दिवा-मुंब्रा यांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर रुळाला तडा गेल्याचे आढळले. त्यानंतर मध्य रेल्वेची डाउन दिशेकडे जाणारी धिम्या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबली होती. त्याचा परिणाम अप दिशेकडे येणाऱ्या वाहतुकीवरही झाला. अखेर रेल्वे कामगारांनी रूळ दुरुस्तीचे काम केले. त्यानंतर या मार्गावर ताशी १० किमी या वेगाने गाडय़ा चालवण्यास परवानगी देण्यात आली.

या बिघाडातून मध्य रेल्वेची वाहतूक सावरते नाही तोच, आसनगाव-वासिंद स्थानकाजवळ अप मार्गावर रुळाला तडा गेला. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या गाडय़ा खोळंबल्या. त्याचापरिणाम पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला. हा बिघाड दूर होण्यासाठी ५० मिनिटे लागली. ११.४० वाजता रूळ दुरुस्त झाला. त्यानंतर या मार्गावरही वेगमर्यादा लावल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Crack in track disrupts central railway services

ताज्या बातम्या