scorecardresearch

मुंबई : नायगाव स्थानकात क्रेनची लोकलला धडक, मोठी दुर्घटना टळली, मोटरमन जखमी

शुक्रवारी मध्यरात्री नायगाव फलाट क्रमांक एकवर उद्वाहकासाठी स्टीलचे खांब उभारण्यासाठी ब्लॉकचे नियोजन करण्यात आले होते.

Crane collides with local at Naigaon station
नायगाव स्थानकात क्रेनची लोकलला धडक

मुंबई : नायगाव स्थानकात उद्वाहकाचे (लिफ्ट) काम सुरू असताना तृतीयपंथीयाकडून अचानक करण्यात आलेल्या दगडफेकीमुळे अनियंत्रित झालेल्या एका क्रेनची स्थानकात प्रवेश करणाऱ्या लोकला गाडीला धडक लागल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. या अपघातात मोटरमन जखमी झाला असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे. पश्चिम रेल्वे आणि रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

शुक्रवारी मध्यरात्री नायगाव फलाट क्रमांक एकवर उद्वाहकासाठी स्टीलचे खांब उभारण्यासाठी ब्लॉकचे नियोजन करण्यात आले होते. या कामासाठी रुळाला समांतर काही अंतरावर क्रेन उभी करण्यात आली होती. ब्लॉक घेऊन हे काम सुरू करण्यात आले होते. त्याच वेळी अचानक रुळाजवळच उभ्या असलेल्या तृतीयपंथीयाने क्रेनवर जोरदार दगफेक केली. त्यामुळे  चालकाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्याला क्रेन नियंत्रित करता आली नाही. त्याचवेळी मध्यरात्री ००.५५ वाजता एक उपनगरीय विरार लोकल डाऊन दिशेला येऊन नायगाव स्थानकात प्रवेश करत होती.

हेही वाचा >>> कलिना येथील सेवानिवासस्थान रिकामे करण्याचा वाद : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाचा तूर्त दिलासा

क्रेन चालकाला नुकत्याच झालेल्या दुखापतीमुळे क्रेन नियंत्रित करणे कठीण झाले आणि क्रेनचे हुक लोकलच्या काचेला धडकला. त्यांमुळे  समोरील काचा फुटल्या आणि मोटरमनच्या डोक्याला मार लागला. दरम्यान, मोटरमनला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. या घटनेनंतर लोकल रिकामी करून विरार कारशेडमध्ये नेण्यात आली. यामुळे लोकल अपघाताची मोठी दुर्घटना घडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. नायगाव स्थानकाजवळ रुळाच्या शेजारी तृतीयपंथीय बेकायदेशीर कृत्य करीत असून  रेल्वेच्या कामाला विरोध की अन्य काही कारणामुळे दगडफेक झाली याचा तपास पश्चिम रेल्वे आणि रेल्वे पोलीस करीत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 11:07 IST