करी रोड येथील इमारतमालकाविरुद्ध गुन्हा

आग लागलेले घर क्रमांक १९०२ मधील घरकामगार महिला व घर मालकाच्या १८ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.

‘वन अविघ्न पार्क’मधील  अग्निशमन यंत्रणा निरुपयोगी

मुंबई : करी रोड येथील वन अविघ्न पार्क  इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा वेळेवर कार्यान्वित न  झाल्यामुळे  शनिवारची दुर्घटना घडल्याची तक्रार अग्निशमन दलाकडून करण्यात आली. त्यानुसार काळाचौकी पोलिसांनी इमारतीचा मालक व अग्निशमन यंत्रणेच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 साहाय्यक अग्निशमन अधिकारी चंद्रदास पवार यांच्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ३०४(अ), ३३६सह महाराष्ट्र आग प्रतिबंध व जीव संरक्षण उपाय योजना अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले त्यावेळी इमारतीच्या अग्निशमन यंत्रणेतून पाणी येत नव्हते. तसेच काही काळाने पाणी यायला लागले, त्यावेळी त्याचा दाब कमी होता. त्यामुळे आग विझवण्यात विलंब झाला, असे पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले की, याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून सध्या  संबंधित कामांची जबाबादारी कोणावर आहे, याची माहिती घेण्याचे काम सुरू  आहे.   दुर्घटना घडली त्यावेळी इशाऱ्याचा भोंगा वाजला नाही किंवा पाण्याचे फवारेही चालले नाहीत.

 पोलिसांनी  आठ जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात आग लागलेले घर क्रमांक १९०२ मधील घरकामगार महिला व घर मालकाच्या १८ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.

 दरम्यान, विकसक कंपनीकडून आरोपांचे खंडन करण्यात आले असून उत्तम प्रतीची अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

सुरक्षा रक्षकाच्या    मृत्यूची चौकशी

मृत सुरक्षा रक्षक अरुण तिवारी नेमका घरात कधी शिरला याची माहिती घेतली जात आहे. घरात अडकलेल्या व्यक्तींना वाचवण्यासाठी तो नोकरांसाठी असलेल्या दरवाजातून घरात शिरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तो घरात शिरल्यानंतर आग खूप पसरली, त्यामुळे त्याला बाहेर पडता आले नाही. परिणामी त्याने बाल्कनीतून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Crime against the building owner at curry road fire fighting system useless akp

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या