लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : भिशीतून घेतलेले कर्ज फेडल्यानंतरही आणखी पैशांसाठी कल्याणमधील ४१ वर्षीय व्यक्तीला घरात डांबून ठेवल्याचा प्रकार मुलुंडमध्ये घडला. घरात डांबलेल्या व्यक्तीने पळ काढून नवघर पोलीस ठाणे गाठले आणि याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी बुधवारी खंडणीचा गुन्हा नोंदवला.

कल्याण येथे वास्तव्यास असलेले कालुराम भोई यांनी काही महिन्यांपूर्वी मुलुंडमध्ये वास्तव्यास असलेल्या गुप्ता कुटुंबियांकडून सव्वालाख रुपये कर्ज घेतले होते. हे कर्ज भिशीतून घेतल्याने सव्वालाख रुपयांच्या बदल्यात त्यांनी सव्वातीन लाख रुपये भरले. मात्र त्यानंतरही त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी करण्यात आली. यासंदर्भात ते बुधवारी मुलुंड येथील गुप्ता यांच्या घरी गेले होते. यावेळी उभयतांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर भोई यांना मारहाण करून काही वेळ घरात डांबून ठेवण्यात आले.

आणखी वाचा-मुंबईकरांचा मरीन ड्राईव्ह-वांद्रे प्रवास आजपासून जलद

काही वेळानंतर भोई यांनी स्वतःची सुटका करून नवघर पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी महेंद्र गुप्ता, सिमा गुप्ता आणि सत्तीदेवी गुप्ता या तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.