मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांच्याविरोधात बुधवारी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पेडणेकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

वरळीच्या बीडीडी चाळीतील दुर्घटनेनंतर आशीष शेलार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तिथे सिलिंडरचा स्फोट होऊन चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आणि पाठोपाठ त्याच्या वडिलांनाही प्राण गमवावे लागले. मुंबईच्या महापौर मात्र ७२ तास उलटल्यानंतर रुग्णालयात पोहोचल्या. याच मुद्द्यावरुन शेलार यांनी महापौरांना लक्ष्य केले होते. नायर रुग्णालयात गेलेल्या जखमींना तब्बल ४५ मिनिटे उपचारांविना तसेच ठेवले गेले. त्यांच्यावर औषधोपचार नाही किंवा विचारपूसही करण्यात आली नाही. या बेफिकिरीमुळे चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला, असे नमूद करत शेलार यांनी महापौरांवर टीका केली होती.