मुंबई : गुन्हे शाखेने ३२ वर्षीय तोतया सनदी (आयएएस) अधिकाऱ्याला अटक केली आहे. आरोपीने बनावट ओळखपत्र व मोटरगाडीवर भारत सरकार लिहिलेले बनावट चिन्ह चिकटवले होते. त्याच्या आधारावर आरोपी गेल्या दोन दिवसांपासून वांद्रे कुर्ला संकुल येथील सीमाशुल्क विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये शासकीय अधिकारी असल्याचे सांगून राहत होता. आरोपीकडील केंद्रीय गृहविभागाचे बनावट ओळखपत्र, सुरक्षा विभागाचे व्हिजिटिंग कार्ड जप्त करण्यात आले.

चंद्रमोहन प्रसाद रामबळी सिंह (३२) असे अटक आरोपीचे नाव असून तो मूळचा बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील महुआ येथील रहिवासी आहे. मालाड पश्चिम येथील सिल्वर ओक हॉटेलसमोर तोतया सनदी अधिकारी असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-१२ ला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे अधिकारी तेथे पोहोचले असता एका मोटरगाडीवर भारत सरकार लिहिलेले होते. त्या मोटरगाडीमध्ये एक चालक व मागे एक व्यक्ती बसली होती. त्याला विचारणा केली असता आपण आयएएस अधिकारी असल्याचे सांगून त्याने बनावट ओळखपत्र दाखवले. त्याला ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या कक्षात आणले असता त्याने ओळखपत्र बनावट असून सनदी अधिकारी नसल्याचे$ मान्य केले. तो गेल्या दोन दिवसांपासून बीकेसी येथील पन्हाळा या सीमाशुल्क विभागाच्या अतिथीगृहात दोन दिवसांपासून राहत होता. तेथेही आरोपीने बनावट ओळखपत्राद्वारे सनदी अधिकारी असल्याचे भासवले होते. सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे.

आरोपीकडे त्याच्या नावाचे केंद्रीय गृहविभागाचे बनावट ओळखपत्र, सेक्शन ऑफिसर (सुरक्षा विभाग) व्हीजिटिंग कार्ड, आधारकार्ड, दोन मोबाइल फोन सापडले असून पोलिसांनी ते जप्त केले आहेत. आरोपी वापरत असलेल्या मोटरगाडीमध्ये भारत सरकार लिहिलेला फलक व टॅब सापडला आहे. या वस्तूही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच आरोपी वापरत असलेली मोटरगाडीही पोलिसांनी जप्त केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. चालकाकडे याबाबतच चौकशी केली असता ती मोटरगाडी कांबळे नावाच्या व्यक्तीची आहे. चालकाचा मित्र त्या मोटरगाडीवर कामाला होता. त्यानेच चालकाला दूरध्वनी करून पन्हाळा अतिथीगृहातून चंद्रमोहन नावाच्या साहेबांना मोटरगाडीतून त्यांना हव्या त्या ठिकाणी घेऊन जाण्यास सांगितले होते. ते ऑडीट करण्यासाठी मुंबईत आल्याचेही सांगितले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतूक पोलिसांनाही फसवले

आरोपी वापरत असलेली मोटरगाडी दादर येथे वाहतूक पोलिसांनी अडवली होती. पण त्यांनाही आरोपीने ओळखपत्र दाखवून आपण सनदी अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याची मोटरगाडी सोडली होती. याशिवाय आरोपीने काही अधिकाऱ्यांनाही भेटण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. त्याबाबत पोलीस तपास करत आहेत.