मुंबई: विविध राज्यांमध्ये मोबाइलची चोरी केल्यानंतर त्यांचे ईएमआय नंबर बदलून याच मोबाइलची पुन्हा विक्री करणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखेने गोवंडी येथून अटक केली आहे. या टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी १६ लाख रुपये किमतीचे एकूण १६२ मोबाइल जप्त केले असून पोलीस त्यांच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत. गोवंडी-शिवाजी नगर परिसरातील बैंगणवाडी परिसरात काहीजण मोठ्या प्रमाणात चोरीचे मोबाइल विकत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट सहाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. पोलिसांनी खात्री करून घेतल्यानंतर सोमवारी याठिकाणी छापा घातला. यावेळी पोलिसांना एका घरात मोबाइलचा मोठा साठा मिळाला. त्यानुसार पोलिसांनी तेथे असलेल्या तौसीब सिद्धीकी (३२), मेराज शेख (३४) आणि रजा शेख (२४) या तिघांना ताब्यात घेतले. तपासात त्यांनी हे मोबाइल विविध राज्यांतून तेथे आणल्याची माहिती पोलिसांना दिली. हेही वाचा - मुंबई : सुमारे आठ कोटींच्या कर फसवणुकीप्रकरणी कंपनीसह दोघांविरोधात गुन्हा हेही वाचा - मुंबई : कामाठीपुऱ्यात ५८ मजली पुनर्वसित इमारती, तर विक्री योग्य इमारती असणार ७८ मजल्याच्या गोवंडी परिसरातच या मोबाइलचे ईएमआय नंबर बदलले जात होते. त्यानुसार पोलिसांनी तीन आरोपींच्या माहितीवरून ईएमआय नंबर बदलणाऱ्या दुकानावर देखील याच वेळी छापा घातला. यावेळी पोलिसांनी असिफ शहा (३२) आणि जहांगीर जाहिद (२६) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देखील पोलिसांनी काही मोबाइल यावेळी जप्त केले. आशा प्रकारे या टोळीकडून पोलिसांनी १५ लाख ८९ हजारांचे एकूण १६२ मोबाइल जप्त केले आहेत. तसेच या टोळीत आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यानुसार पोलीस त्यांच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत.