मुंबई : अल्पवयीन मुलांना तृतीयपंथी बनवून त्यांच्याकडून वेश्याव्यसाय करून घेणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. बाबू खान (३०) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात चार ते पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात राहणारे यातील तक्रारदार यांच्या अल्पवयीन मुलाचे काही दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. परिसरातील एका तृतीयपंथी टोळीने मुलाचे अपहरण करून त्याला तृतीयपंथी बनवल्याची तक्रार मुलाच्या वडिलांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात केली होती. तपासात या मुलाला लोकलमध्ये भीक मागण्यास लावण्यात आले. तसेच त्याच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस या टोळीचा म्होरक्या बाबू खान याचा अनेक दिवसांपासून शोध घेत होते.

या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा परिमंडळ सहाकडून सुरू होता. तपासात हा आरोपी नवीमुंबई परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नवीमुंबई येथे त्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता. मात्र पोलीस कारवाईची माहिती मिळताच त्याने मोटारगाडीने मुंबईच्या दिशेने पळ काढला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्याला चेंबूर परिसरातून अटक केली आहे. तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यानुसार त्याला अधिक चौकशीसाठी शिवाजी नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अटक आरोपीने अशाच प्रकारे अनेक अल्पवयीन मुलांना तृतीयपंथी बनवले आहे. त्यानुसार त्याच्यावर गोवंडीच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दोन तर कुर्ला, देवनार आणि नवीमुंबईतील नारपोली पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.