मुंबई : ऑनलाइन फसवणूक केल्यानंतर रक्कम वळती करण्यासाठी बनावट बँक खाती उघडणाऱ्या दोन आरोपीना गुन्हे शाखेने अटक केली. यावेळी पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून मोबाइल, लॅपटॉप आणि विविध बँकेचे ५० हून अधिक पासबुक आदी मुद्देमाल जप्त केला.
गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फसवणूक करणारे आरोपी सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्या बँक खात्यातून लाखो रुपये गायब करत आहेत. फसवणुकीचे पैसे वळते करण्यासाठी आरोपींनी मोठ्या प्रमाणात विविध बँकांच्या शाखांमध्ये बनावट खाती उघडली आहेत.
अशाच प्रकारे मस्जिद बंदर परिसरातील एका कार्यालयातून मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या पैशांचा व्यवहार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा परिमंडळ ३ च्या अधिकाऱ्यांना मिळाली. अधिकाऱ्यांनी खात्री केल्यानंतर बुधवारी या कार्यालयावर छापा घातला.
यावेळी या कार्यालयातून पोलिसांनी शाकिब नवाज शोरत आली खान (४६) आणिजमीर अहमद मोहम्मद जावेद अन्सारी (४२) या दोघांना ताब्यात घेतले. या आरोपींनी ऑनलाइन फसवणुकीतील पैसे वळते करण्यासाठी एकूण ९ बनावट कंपन्या स्थापन केल्याचे तपासात उघड झाले. या कंपन्यांच्या नावाने विविध बँकांच्या शाखांमध्ये एकूण ५५ खाती उघडली होती. या बनावट खात्यांमध्ये आरोपी फसवणुकीचे पैसे वळते करत होते. त्यानंतर ही रक्कम आरोपी बँकेतून काढून घेत होते. या आरोपींनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
छाप्यादरम्यान पोलिसांनी या आरोपींच्या ताब्यातून दहा मोबाइल, दोन लॅपटॉप, दोन पेन ड्राइव्ह, ५० हून अधिक बँक पासबुक आणि एक लाख ३ हजारांची रोख रक्कम असा एकूण दोन लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात एक मोठी टोळी सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

