मुंबई : बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी आलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी रात्री कुर्ला परिसरातून अटक केली. आरोपीच्या ताब्यातून बिबट्याची कातडी हस्तगत करण्यात आली असून त्याबाबत गुन्हे शाखा कक्ष - ५ तपास करीत आहे. गणेश रहाटे (४४) असे अटक आरोपीचे नाव असून तो प्रभादेवी परिसरातील रहिवासी आहे. गुन्हे शाखा कक्ष-५ चे प्रभारी अधिकारी घन:श्याम नायर यांना एक संशयीत व्यक्ती कुर्ला विद्याविहार येथे बिबट्याचे कातडे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तेथे सापळा रचला होता. त्यावेळी एक संशयीत व्यक्ती तेथे आला. हेही वाचा.आरेमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा, विविध मागण्यांसाठी आदिवासी बचाव यात्रा संशयावरून त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या बॅगेत एक प्राण्याचे कातडे आढळले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता ते कातडे बिबट्याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वन्यजीव संरक्षक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी रहाटेला गुन्हे शाखेने अटक केली. आरोपीकडून १७८ सेमी लांब व ४१ सेमी रुंद कातडी जप्त करण्यात आले असून या बिबट्याची शिकार कोठे करण्यात आली, त्यात कोणकोण सहभागी होते, याबाबत गुन्हे शाखा तपास करीत आहे.