मुंबई : गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरातील एका अडीच वर्षाच्या मुलाचे गुरुवारी सायंकाळी एका अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. मात्र गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अवघ्या काही तासांमध्ये तपास करून या मुलाचा शोध घेतला असून सध्या या मुलाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरातील बैंगनवाडी येथे हा अडीच वर्षाचा मुलगा आई - वडिलांसोबत राहत असून गुरुवारी सायंकाळी तो घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाला. त्याच्या आई - वडिलांनी परिसरात त्याचा बराच वेळ शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. अखेर रात्री उशिरा त्यांनी शिवाजी नगर पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. हेही वाचा.नव्या २० डब्यांच्या वंदे भारत ट्रेनची यशस्वी चाचणी याप्रकरणी गुन्हे शाखा परिमंडळ ६ समांतर तपास करीत होते. पोलिसांनी परिसरातील शेकडो सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासले. मात्र मुलाचा शोध लागला नाही. अखेर एका महिलेला याच परिसरात लहान मुलगा सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या महिलेचा शोध घेतला. या महिलेकडे सदर मुलगा सापडला. हेही वाचा.मुंबई : म्हाडाची अल्प गटात महागडी घरे, वरळीतील सदनिका २.६२ कोटींची; मासिक उत्पन्नाची मर्यादा ७५ हजार रुपये पोलिसांनी या महिलेची चौकशी केली असता येथील एका मस्जिदीजवळ हा मुलगा सापडल्याचे तिने सांगितले. या मुलाच्या आई, वडिलांचा बराच वेळ शोध घेतला. मात्र कोणीही या मुलाला ओळखत नव्हते. त्यामुळे मुलाला घरी घेऊन आल्याची माहिती तिने पोलिसांनी दिली. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. दरम्यान, या मुलाचे अपहरण झाल्याचा संशय असून हा मुलगा मशिदीपर्यंत कसा पोहोचला याचा तपास पोलीस करीत आहेत.