scorecardresearch

विशाल कारियाच्या आर्थिक प्रगतीवर गुन्हे शाखेची नजर

गुन्हे शाखेने विशालच्या गेल्या दहा वर्षांमधील हालचाली तपासण्यास सुरूवात केली आहे

विशाल कारियाच्या आर्थिक प्रगतीवर गुन्हे शाखेची नजर
विशाल कारिया

कमला मिल अग्निकांडातील आरोपींना आश्रय देणाऱ्या विशाल कारियाच्या आर्थिक प्रगतीने मुंबई गुन्हे शाखेच्या भुवया उंचावल्या आहेत. ही प्रगती त्याने कशी साध्य केली हे जाणून घेण्यासाठी गुन्हे शाखेकडून विशालची चौकशी पुढे सुरू राहाण्याची दाट शक्यता आहे.

वन अबव्हचे मालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांना आश्रय दिल्याचा आरोप ठेवत ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी विशालला बेडय़ा ठोकल्या. तर क्रिकेटवरील सट्टा, सट्टेबाज, क्रिकेटपटू यांच्याशी संबंधांबाबत गुन्हे शाखेने स्वतंत्रपणे तपास सुरू केला. ना. म. जोशी मार्ग पोलिसांच्या कोठडीत असताना गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने विशालकडे सट्टेबाजीबाबत कसून चौकशी केली. नववीपर्यंत शिकलेला विशाल दहा वर्षांपुर्वी सोनी मोनी मॉलमध्ये सात ते आठ हजार रुपये पगारावर मजूरी करत होता. मात्र आजघडीला पश्चिम उपनगरांत त्याच्या नावे दोन रेस्टॉरेन्ट-बार आहेत. या दोन्ही आस्थापनांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक भागीदारी विशालची आहे. तसेच जुहू येथे आलिशान घरात त्याचे वास्तव्य आहे, अशी माहिती या चौकशीतून  मिळाली.

विशालचे वडील रंगांचे घाऊक विक्रेते होते. या पाश्र्वभुमीवर तो दोन हॉटेलचा मालक कसा बनला, क्रिकेट विश्वातील आघाडीच्या खेळाडू, क्रिकेट नियामक मंडळाशी संबंधीत पदाधिकाऱ्यांशी त्याची ओळख कशी, याबाबत  चौकशी केली गेली. मात्र त्याने या चौकशीला फारसे सहकार्य केलेले नाही.

गुन्हे शाखेने विशालच्या गेल्या दहा वर्षांमधील हालचाली तपासण्यास सुरूवात केली आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींबाबतही  चौकशी सुरू असल्याचे समजते. दरम्यान, गेल्या आठवडय़ात कमला मिल प्रकरणातून विशालने जामीन मिळवला.

गुरूवारी रात्री भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग जुहू येथील विशालच्या निवासस्थानी उपस्थित होता. हरभजनची पत्नी, अभिनेत्री गीता बसरा आणि विशाल एकमेकांना आधीपासून ओळखतात.

‘वन अबव्ह’च्या मालकांविरोधात नवा गुन्हा ;  कामगारांची आर्थिक फसवणूक केल्याची भविष्यनिर्वाह निधी विभागाकडून तक्रार

मुंबई : कामगारांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल ‘वन अबव्ह रेस्टोपब’च्या तीन मालकांविरोधात शुक्रवारी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी आणखी एक गुन्हा नोंदवला. भविष्य निर्वाह निधी विभागाने(पीएफ) दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. मालकांनी रेस्टोपबच्या सुमारे शंभर कामगारांच्या पगारातून काही रक्कम ‘पीएफ’ खात्यात भरण्यासाठी बाजूला काढली. प्रत्यक्षात ती खात्यात न भरताच वैयक्तिक कारणांसाठी वापरली. वन अबव्हच्या सुमारे शंभर कामगारांना साडेआठ लाख रुपयांना फसवल्याची तक्रार   अधिकाऱ्यांनी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्या आधारे विश्वासघात, फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला.  वन अबव्हच्या तीन मालकांना  सदोष मनुष्यवधाच्या गुन्हय़ात या आधीच अटक करण्यात आली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून या नव्या गुन्हय़ामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकेल. या नव्या तक्रारीमुळे पोलीस या तिघांनाही पुन्हा एकदा ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2018 at 02:11 IST

संबंधित बातम्या