गोरेगाव येथील चित्रनगरीतील विविध कामांचे कंत्राट मिळवण्यासाठी रक्तपात घडविणाऱ्या संघटित टोळीच्या सदस्याला गुन्हे शाखेने नाशिक येथून अटक केली. अक्षय पाटील असे अटक  आरोपीचे नाव आहे. जुल महिन्यात अक्षय आणि त्याच्या टोळीने येथील अधिकृत कंत्राटदारावर प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी मोक्कान्वये कारवाई सुरू केली होती. तेव्हापासून अक्षय फरार होता.

चित्रनगरीत चित्रपटांसह हिंदी, मराठी मालिका, रिअ‍ॅलिटी शोचे चित्रीकरण होते. चित्रीकरणासाठी आवश्यक असलेला सेट उभारणे, सुरक्षा रक्षक पुरवणे, काम पूर्ण झाल्यावर सेट तोडणे, आवश्यक सामान वाहनांमधून उचलणे-ठेवणे आदी कामांसाठी मोठय़ा रकमांचे कंत्राट दिले जाते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दोन गटांमध्ये ही कंत्राटे मिळवण्यावरून नेहमीच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संघर्ष सुरू असतो. जुलै महिन्यात यापैकी एका गटाला मालिकेचे कंत्राट मिळाले होते. त्यावरून दुसऱ्या गटाचा म्होरक्या शिवा शेट्टी आणि साथीदारांनी प्रतिस्पर्धी कंत्राटदारावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रतिस्पर्धी कंत्राटदार गंभीर जखमी झाला. आरे पोलिसांनी सुरुवातीला हत्येचा प्रयत्न आणि अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवला. मात्र शेट्टी याची गुन्हेगारी पाश्र्वभूमी, पैशांसाठी केलेले गुन्हे लक्षात घेता स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी मोक्कान्वये गुन्हा नोंदवला. तेव्हापासून अक्षय फरार होता.गुन्हे शाखेच्या दहिसर कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सागर शिवलकर यांना अक्षय नाशिकच्या घोटी गावात दडून बसल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून गुरुवारी पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.

 बोगस डॉक्टर अटकेत

मुंबई : शहराच्या विविध भागांत एकाच वेळी छापे घालून गुन्हे शाखेने सहा बोगस डॉक्टरांना गुरुवारी अटक केली. शाहिद हुसेन अलीअहमद हुसेन बेग (डोंगरी), कमाल शराफत हुसेन (रफी अहमद किडवई मार्ग), शहाबुद्दीन कल्लू शेख (अँटॉप हिल), जाफर शेख (धारावी) आणि बिलाल हुसेन (कुर्ला), आमीर जाफर शेख (मालवणी) अशी अटक केलेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत. या सर्वाचे शिक्षण आठवी ते दहावीपर्यंत झाले आहे. गर्दीच्या ठिकाणी लैंगिक समस्या, दुर्धर आजारांवर उपचाराची हमी देणाऱ्या जाहिराती करून रुग्ण गोळा करायचे आणि त्यांच्या व्याधी गंभीर असल्याचे भासवून फसवे उपचार करून पैसे उकळायचे, ही त्यांची कार्यपद्धती होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सात किलो गांजा हस्तगत

मुंबई : घाटकोपर रेल्वेस्थानकाशेजारील महाविद्यालय परिसरात अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या महिलेसह चौघांना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. या चौघांकडून दीड लाख रुपये मूल्य असलेला सात किलो गांजा हस्तगत करण्यात आला. महाविद्यालय परिसरात सर्रास अमली पदार्थाची विक्री होते, अशा तक्रारी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्याकडे आल्या होत्या. त्यांच्या आदेशानुसार अमली पदार्थविरोधी पथकाच्या घाटकोपर कक्षाने सापळा रचून शबाना खान, इलामुद्दीन शेख, महोम्मद जावेद बक्रीदी आणि महोम्मद हारुन शेख या चौघांना अटक केली.