Crime news rape case Incident at Sakinaka Leader of Opposition Devendra Fadnavis akp 94 | गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी -फडणवीस | Loksatta

गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी -फडणवीस

 साकीनाका प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे व हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविले गेले पाहिजे.

गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी -फडणवीस

मुंबई : साकीनाका येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून न्यायालयाने गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. गेल्या काही दिवसांमधील अमरावती, पुणे, पिंपरी, नागपूर आदी ठिकाणी झालेल्या बलात्कार व महिला अत्याचाराच्या घटना राज्याच्या नावलौकिकाला धक्का पोचविणाऱ्या आहेत. सरकार मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्यांमध्ये व्यस्त आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी के ली.

साकीनाका प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे व हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविले गेले पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची भेट घेऊन विनंती करावी. शक्ती कायद्यावर नुसत्या बैठकांचे सत्र सुरू आहे. तरीही सध्या अमलात असलेल्या कायद्यातही कठोर तरतुदी आहेत.

महिला आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करायला सरकारला वेळ नाही, असे सांगून फडणवीस म्हणाले, अशा घटना वारंवार होत असतील तर कायद्याचा धाकही राहत नाही आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते.

‘राज्यात कायद्याचा धाक नाही’

मुंबई : साकीनाका येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेमधील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिलेला नाही.  राज्यात गेल्या काही काळात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये महाविकास आघाडीतील पक्षांचे नेते व कार्यकर्ते सहभागी असल्याचे आणि त्यांच्यावर कारवाई करू नये, यासाठी सरकारकडून पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचे दिसून आले आहे.

‘महिनाभरात आरोपपत्र दाखल करावे ’

मुंबई  : साकीनाका बलात्कार घटनेतील आरोपीच्या विरोधात महिनाभरात आरोपपत्र न्यायालयात दाखल करावे आणि एक सुरक्षित शहर म्हणून मुंबईची असलेली प्रतिमा डागळणार नाही याची खबरदारी घ्यावी, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साकीनाका घटनेच्या पाश्र्वाभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शनिवारी दिला.

साकीनाका येथे महिलेवर झालेला निर्घुण बलात्कार आणि त्यानंतर तिचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना असून एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावे, जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे जेणे करून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही. उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्तांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी असे स्पष्ट निर्देशही  ठाकरे यांनी दिले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-09-2021 at 00:12 IST
Next Story
तिसऱ्या लाटेची भीती, चाचण्या मात्र कमी!