आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासाला सुरुवात

अनिश पाटील, लोकसत्ता

मुंबई : व्यायामशाळा क्षेत्रातील प्रसिद्ध तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लि.शी संबंधीत आठ व्यक्तींविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०६ कोटी रुपयांच्या बुडीत कर्जाप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल केला. कर्ज बुडवल्याप्रकरणी राष्ट्रीयकृत बँकेने केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यात याप्रकरणी भादंवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४७१, व १२०(ब) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या बँकिंग (फसवणूक) २ कक्षाकडे वर्ग करण्यात आला आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गुन्हा दाखल झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला.

याप्रकरणी तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लि.चे गिरीश मधुकर तळवलकर, प्रशांत सुधाकर तळवलकर, विनायक गवांदे, अनंत गवांदे, हर्ष भटकर, मधुकर विष्णू तळवलकर, दिनेश राव व गिरीश नायक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१६ ते २०१९ या कालावधीत बँकेची २०६ कोटी ३५ लाखांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार अ‍ॅक्सिस बँकेकडून करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी सहा महिने प्राथमिक चौकशी केल्यानंतर १४ ऑक्टोबरला गुन्हा दाखल केला आहे.  गुन्हे शाखेकडे इतर बँकांनीही याप्रकरणी तक्रारी केल्या आहेत.

त्याचीही प्राथमिक चौकशी आर्थिक गुन्हे शाखा सध्या करत आहे. २०१९ मध्ये कर्जाची मुद्दल व व्याजाची रक्कम भरली गेली नाही. इतरही प्रकरणांमध्ये प्राथमिक चौकशी सुरू असून त्याबाबत अद्याप बोलणे उचित नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या व्यायामशाळेची स्थापना १९३२ मध्ये करण्यात आली होती. या व्यायामशाळेचे ८० शहरांमध्ये १५२ हेल्थक्लब सुरू करण्यात आले होते. त्याचे दोन लाखांहून अधिक सदस्य आहेत.

कंपनीचे म्हणणे..

दीड वर्षांपूर्वी आम्ही याप्रकरणी संपूर्ण चौकशी व्हावी, अशी स्वत: मागणी केली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे आम्ही अधिक बोलू शकत नाही, असे तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लि. यांच्याकडून सांगण्यात आले.