या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयेश शिरसाट

मनोज कोटक यांना शुभेच्छा देताना छायाचित्रे; पक्षाशी संबंध नसल्याचा, ओळखत नसल्याचा दावा

उमेदवारी कोणाला द्यायची, यावरून बरेच दिवस चर्चेत राहिलेल्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप आता नवीन वादात सापडला आहे. भांडुप परिसरातील एका संघटित टोळीचा म्होरक्या आणि त्याचे साथीदार भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांना शुभेच्छा देताना आढळून आले. कोटक यांच्याबरोबर या गुंडांची छायाचित्रे वादाचा मुद्दा ठरू लागली आहेत.

अमित भोगले, आदित्य क्षीरसागर ऊर्फ शिऱ्या, सागर जाधव ऊर्फ सागऱ्या, सुनील चंदनशिवे अशी या सराईत गुन्हेगार, संघटित टोळीतील गुंडांची नावे आहेत. ही मंडळी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहेत. भोगले, क्षीरसागरवर मोक्कान्वये खटला सुरू आहे.

पक्षाने उमेदवारी जाहीर केली त्या रात्री अमित भोगले भांडुपमधील उत्साही मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत कोटक यांना मुलुंड येथील कार्यालयात भेटला. कोटक यांच्या वतीने संवाद साधणाऱ्या भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने या भेटीला दुजोरा दिला आहे. मात्र क्षीरसागर, जाधव, चंदनशिवे या तिघांना कोटक ओळखत नाहीत. त्यांचा पक्षाशी किंवा उमेदवार म्हणजे कोटक यांच्याशी काहीही संबंध नाही, असे या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.

‘लोकसत्ता’च्या हाती लागलेल्या एका छायाचित्रात सागर जाधव नावाच्या गुंडाला कोटक आलिंगन देताना दिसत आहेत. तसेच अन्य एका छायाचित्रात ते जाधव, क्षीरसागर आणि चंदनशिवे यांच्यासोबत दिसत आहेत. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने या भागात लावलेल्या काही फलकांवरही या गुंडांची छायाचित्रे होती, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुलुंड पश्चिम परिसरात भाजपने राबवलेल्या उपक्रमांची जाहिरात करणाऱ्या फलकांवर एका कोपऱ्यात कोटक, दुसऱ्या कोपऱ्यात नील सोमय्या यांची छायाचित्रे आहेत, तर त्याखाली या गुंडांची छायाचित्रे आहेत.

प्रत्येकालाच ओळखतो, असे नाही!

‘त्या दिवशी सुमारे दहा ते पंधरा हजार जणांनी कार्यालयात येऊन, फोनवरून मला शुभेच्छा दिल्या. अनेकांनी त्या वेळी छायाचित्रेही घेतली. त्या प्रत्येकाला मी ओळखतो, त्या प्रत्येकाशी माझा संबंध आहे, असे होत नाही,’ अशी प्रतिक्रिया मनोज कोटक यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

हे सराईत गुंड कोण?

भांडुपमधील टोळीयुद्धातून २०१३ मध्ये संतोष चव्हाण ऊर्फ काण्या संतोष या गुंडाच्या हत्येप्रकरणी भोगले, क्षीरसागर आणि साथीदार मोक्कान्वये अटकेत होते. सर्व आरोपी जामिनावर सुटले. मात्र त्यांच्याविरोधातील खटला सुरू आहे. जाधवविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणीचे गुन्हे नोंद आहेत. भांडुप पोलिसांनी त्याला हद्दपारही केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criminal in the best wishes of the bjp candidate
First published on: 06-04-2019 at 01:31 IST