गुन्हेगारी टोळीला हत्येची सुपारी दिल्याचा संशय

माहिती अधिकार कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या हत्येची कबुली माजी नगरसेवक रझ्झाक खान याचा मुलगा अमजद याने दिली असली तरी संघटित गुन्हेगारी टोळीला सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे या हत्येचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. चार युनिटच्या अधिकाऱ्यांचे विशेष पथक या प्रकरणाचा तपास करणार आहे.

भूपेंद्र वीरा यांचा फक्त रझ्झाक खान यांच्याशी वाद होता. रझ्झाक खान यांनी वाकोला येथील सुमारे १० एकरवर १५० बेकायदा दुकाने उभारली होती. या प्रत्येक दुकानापोटी त्यांना २० ते २५ हजार रुपये भाडे मिळत होते. २०१० मध्ये वीरा यांचे एक गोदामही अशाच पद्धतीने हडपण्यात आले होते. तेव्हापासून वीरा यांनी रझ्झाक खान यांच्या सर्वच मालमत्तांबाबत माहिती अधिकारातून माहिती मिळविण्यास सुरुवात केली.

त्यावेळी मूळ भूखंड वेगळ्याच व्यक्तीच्या मालकीचा असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हापासून त्यांनी सतत पाठपुरावा करून रझ्झाक खान यांची बांधकामे पाडण्याबाबत पालिकेकडे पत्रव्यवहार केला. परंतु, काहीच दाद न मिळाल्याने अखेर लोकायुक्ताकडे धाव घेतली. लोकायुक्तांनी रझ्झाक खान यांच्या सर्वच बेकायदा बांधकामांवर कारवाई करावी, असेही आदेश दिले. या पाश्र्वभूमीवर वीरा यांनी पालिकेकडून रझ्झाक खान यांची चार बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश मिळविले होते. त्याच दिवशी रात्री वीरा यांची हत्या करण्यात आली.

अमजद याने आपणच गोळीबार केल्याचे मान्य केले असले तरी यामागे संघटित गुन्हेगारी टोळी आहे का आणि सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली का, याबाबत आता गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट आठ, नऊ, दहा तसेच दरोडा विरोधी युनिटमधील अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाकडून चौकशी केली जाणार आहे.

या हत्येनंतर वाकोला पोलिसांनी रझ्झाक खान याच्यासह अमजदला अटक केली होती. अमजदने गोळीबार केला तर मग तो फरार का झाला नाही, असा सवालही पोलिसांकडून केला जात आहे.