मुंबई : शारीरिक, मानसिक त्रासाला कंटाळून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ७२ लोको पायलट (मेल) यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला. एकाच वेळी ७२ जणांनी मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना पत्र लिहून स्वेच्छानिवृत्तीला मंजुरी देण्याची मागणी केली आहे.
प्रशासकीय दबाव, छळ केला जात असल्याने सर्व लोको पायलट तणावात काम करत आहेत. अनियमित कर्तव्ये, प्रशासकीय संवेदनशीलतेच्या अभाव यांचा एकत्रित परिणाम शारीरिक, मानसिक ताण वाढत असल्याने ते आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी लोको पायलट एकवटले आहेत.
अडचणी काय?
लोको पायलट यांना विश्रांतिगृहामध्ये पुरवले जाणारे अन्न बहुतेक वेळा निकृष्ट दर्जाचे असते. विश्रांतिगृहात स्वच्छता, योग्य देखभाल आणि आवश्यक सुविधांचा अभाव आहे. ज्यामुळे कामानंतर आराम करता येत नाही. विश्रांतिगृहात योग्य प्रकाशयोजना नसल्याने रात्रीच्या वेळी किंवा प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.
अनेक रिक्त पदे
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सुमारे २४० मेल लोको पायलट कार्यरत आहेत, तर सुमारे २३० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कर्तव्यावरील जादा काम करावे लागते. तसेच मेल चालविताना लोको पायलटकडून अनेकदा नकळतपणे सिग्नलचे नियम मोडले जातात. सिग्नलबाबत चुकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून सक्तीची निवृत्ती (सीआरएस)ची कारवाई केली जाते. काही वेळा वेतनात कपात केली जाते. तसेच त्यांच्या पदाची श्रेणी कमी केली जाते. त्यामुळे सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांचे आर्थिक नुकसान होते. यातून ५० वर्षांपुढील काही जण स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी इच्छुक आहेत, असे एका लोको पायलटने सांगितले.
निवेदनात काय?
रेल्वेला समर्पित सेवा दिल्यानंतर, आमचे आरोग्य, सुरक्षितता, प्रतिष्ठा यावर परिणाम करणार्या सततच्या समस्यांमुळे स्वेच्छानिवृत्तीच्या निर्णयावर पोहोचण्यास भाग पडले आहे. हे मुद्दे वारंवार संबंधित अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले. परंतु कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे एकाच वेळी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे ७२ लोको पायलटनी मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

