शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित होत असताना महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यापूर्वीच शिवसेनेचे अनेक नेते अयोध्येत पोहोचले आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या तयारीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत आधीच अयोध्येत हजर आहेत. आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम पूर्णपणे धार्मिक आहे. त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नये. अयोध्येला गेल्याने ऊर्जा मिळते, असा शिवसेनेचा विश्वास आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अयोध्या दौऱ्यावरुन आता मनसेने आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. “आज एक जुनी गोष्ट आठवली जेव्हा राणेंनी शिवसेना सोडली होती तेव्हा पोटनिवडणुकीत आज अयोध्येत असलेल सगळे शिवसेनेचे नेते शेपूट घालून बसले होते. काही जण तर घरी बसून लॉलीपॉपचा त्या वेळी आस्वाद घेत असतील. फक्त राज ठाकरे तिथे प्रचार करत होते. सेटिंग करून दौरा आणि हिम्मत असणं यातला फरक आहे,” असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

राज ठाकरेंना कडाडून विरोध तर आदित्य ठाकरेंचे अयोध्येत स्वागत, भापजाचे खासदार ब्रृजभूषण सिंह म्हणतात…

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार ब्रृजभूषण सिंह यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले आहे. बृजभूषण सिंह यांनी विरोध केल्यानंतर राज ठाकरेंना आपला दौरा रद्द करावा लागला होता. मात्र आता राज ठाकरे यांचे पुतणे आणि शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. ब्रृजभूषण सिंह यांनी त्यांच्या भेटीचे स्वागत केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करणारे भाजपा खासदार ब्रिजभूषण यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे स्वागत केले आहे.