मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व बँका व्यस्त राहिल्या. त्यामुळे कर्जदार शेतकऱ्यांचा बँकेमार्फत विमा योजनेतील सहभाग हा अपेक्षेपेक्षा कमी राहिला. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील सहकारी बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी केली होती. ती मागणी मान्य करून कर्जदार शेतकऱ्यांना नोंदंणीसाठी ऑगस्ट अखेरची वाढीव मुदत देण्यात आली आहे.

राज्यात खरीप हंगाम २०२६ मध्ये पीक विमा योजना ३ जुलै २०२६ रोजी सुरू करण्यात आली. यामध्ये नियमित भाग घेण्याची मुदत ३१ जुलै अशी होती. चालू वर्षी उशिरा आलेल्या पावसामुळे पिकाच्या पेरण्या लांबल्या यामुळे शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेण्यासाठी १० ऑगस्ट पर्यंत सर्वांना मुदतवाढ देण्यात आली. १० ऑगस्ट पर्यंत प्राप्त विमा अर्ज ८१.४० लाख आहेत. या द्वारे राज्यातील ५२.४५ लाख क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे.

दरम्यानच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजना जाहीर केल्याने या प्रक्रियेत सर्व बँका असल्यामुळे कर्जदार शेतकऱ्यांचा बँकेमार्फत विमा योजनेतील सहभाग हा अपेक्षेपेक्षा कमी राहिला. यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी कर्जदार शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ मिळणे बाबत केलेल्या अर्जानुसार राज्य शासनाने केंद्र सरकारकडे विनंती केली.

राज्यात विमा योजना राबवणाऱ्या कंपन्यांकडून या बाबत नियमाप्रमाणे सहमती घेण्यात आली. विमा कंपन्यांनी दिलेल्या सहमतीनुसार कर्जदार शेतकऱ्यांना भाग घेण्यासाठी दिनांक १७ ऑगस्ट ते दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता राज्यातील बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करून विमा योजनेत सहभागा विषयी अधिक प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.

जिल्हानिहाय कर्जदार शेतकरी यांना मिळालेली मुदतवाढ :

१७ ऑगस्ट पर्यंत मुदत मिळालेले जिल्हे – अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, यवतमाळ, अमरावती व गडचिरोली.

२० ऑगस्ट पर्यंत मुदत मिळालेले जिल्हे – सोलापूर, जळगाव, सातारा, हिंगोली, अकोला, धुळे व पुणे.

३१ ऑगस्ट पर्यंत मुदत मिळालेले जिल्हे – परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, वाशिम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार, धाराशिव, लातूर व बीड.