मुंबई/ठाणे : करोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण करून दोन आठवडे लोटलेल्या नागरिकांना उपनगरी रेल्वेप्रवासाचे तिकीट देण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सोमवारी, सर्वच उपनगरीय स्थानकांतील तिकीट खिडक्यांवर प्रवाशांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. मासिक पासच्या सक्तीतून सुटका झाल्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान होते तर, सणासुदीच्या खरेदीनिमित्त बाहेर पडलेल्यांनीही यामुळे मोठा दिलासा मिळाला.

करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने लोकलसेवा पूर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी दिली. मात्र, केवळ पासधारक प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी होती. अधूनमधून रेल्वे प्रवास करणाऱ्यांनाही पासच काढावा लागत होता. याचा आर्थिक फटका बसू लागल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तिकिटाच्या आधारे प्रवास करण्याची परवानगी देऊन लोकलची दारे खऱ्या अर्थाने लसीकरण झालेल्या प्रवाशांसाठी खुली केली. याचा परिणाम सोमवारी लगेच पाहायला मिळाला. ठाणे रेल्वे स्थानकात तिकीट खिडक्यांवर सकाळपासूनच प्रवाशांच्या रांगा पहायला मिळाल्या. तसेच स्थानकामध्येही प्रवाशांची दररोजच्या तुलनेत अधिक गर्दी होती. ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ कसा काढावा यासाठी ठाणे महापालिकेच्या पथकाने एक माहितीही तयार केली होती. त्याआधारे अनेकजण ऑनलाइन ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ काढत होते. डोंबिवली, कल्याण, शहाड, विठ्ठलवाडी, टिटवाळा, आंबिवली, कोपर रेल्वे स्थानकातही प्रवाशांची गर्दी झाली होती. काही प्रवाशांनी रविवारी सायंकाळीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रमाणपत्र प्रमाणित केले.  बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर या तिन्ही रेल्वे स्थानकांच्या तिकट खिडकीवर नियमितपणे मासिक पास काढणाऱ्या नागरिकांचीच गर्दी दिसून आली. 

लहानप्रवाशांचे काय?

दोन्ही लसमात्र पूर्ण करून १४ दिवस उलटून गेलेल्यांना रेल्वे तिकिटावर प्रवासाला परवानगी मिळाली असली तरी, लहान मुलांच्या प्रवासाचा पेच कायम आहे.  पाच ते १२ वयोगटातील लहानग्यांना निम्मे तिकीट आकारण्यात येते. मात्र, या प्रवाशांना परवानगी नसल्यामुळे त्यांना तिकीट मिळत नाही.  दोन लसमात्रा झालेल्या पालकांना या वयोगटातील लहानग्यांना घेऊन लोकल प्रवास करता येत नाही. 

रांगांत गोंधळ

पास आणि तिकीटखरेदीसाठी एकच रांग लागल्याने अनेक स्थानकांत गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.  नवीन पास, तसेच पासाचे नूतनीकरण करतानाही पुन्हा लसमात्रा प्रमाणपत्र आणि आधार कार्डची छायांकित प्रत तिकीट खिडक्यांवरील कर्मचाऱ्यांना दाखवावी लागते. त्यामुळे तिकीट व पास देताना कर्मचाऱ्यांना सर्व कागदपत्रे तपासावी लागत असल्याने या प्रक्रियेला काहीसा वेळ लागत होता.  

लोकल प्रवासाची परवानगी कोणाला द्यावी, कोणाला द्यायची राहिली आहे, त्यामुळे प्रवासात कोणत्या  अडचणी येतील याचा कोणताही विचार होताना दिसत नाही. राज्य सरकारच्या सूचनेबाबत नियोजनाचा अभाव असून रेल्वेकडूनही कोणतेही मार्गदर्शन केले जात नाही. 

नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय एकता प्रवासी संस्था