भाईंदर: मीरा रोड येथे सुरु असलेल्या धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमासाठी राज्य भरातून येत असलेल्या त्यांच्या भाविकांनी आदल्यादिवसापासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. यातील सुमारे दोन हजाराहून अधिक नागरिक हे रात्री पासून मैदानात झोपले असल्याचे दिसून आले आहे.
बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री यांच्या दोन दिवसीय कार्यक्रमाचे मीरा रोड मध्ये आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला राज्यभरातून समर्थन आणि विरोध होत असल्यामुळे विशेष महत्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात बाबाचे दर्शन मिळावे म्हणून त्यांच्या भाविकांनी एक दिवस आधीपासून मैदानात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.तर यातील अनेक नागरिक हे काल कार्यक्रम झाल्यानंतर देखील घरी गेलेले नाही.
आणखी वाचा- “…आणि २१ लाख रुपये घेऊन जा” अंनिसचं पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्रींना जाहीर आव्हान
त्यामुळे मध्यरात्री सुमारे २ हजाहून अधिक नागरिक हे मैदानात उघड्यावर झोपले असल्याचे दिसून आले.यातील काहींकडे त्याची लहान बाळ देखील आहेत.मिळालेल्या माहिती नुसार हे नागरिक मुंबई, पालघर,नागपूर,लातूर,कोल्हापूर,पुणे, नाशिक आणि इतर जिल्हातून आले आहेत.या नागरिकांना दुपारच्या सुमारास अधिक ऊन लागू नये म्हणून आयोजकडून मोठी चादर देण्यात आली आहे.तसेच मैदानात शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे.परंतु इतक्या नागरिकांसाठी हे शौचालय पुरेसे नसून यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. तर कितीही परीक्षा घेतली तरी बाबांचे दर्शन घेतल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही,असा दावा हा शास्त्री यांच्या भक्तांकडून केला जात आहे.