scorecardresearch

चैत्यभूमीवर अलोट गर्दी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात लाखोंच्या संख्येने अनुयायी दाखल झाले आहेत.

चैत्यभूमीवर अलोट गर्दी
चैत्यभूमीवर अलोट गर्दी

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात लाखोंच्या संख्येने अनुयायी दाखल झाले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे महापरिनिर्वाणदिनी दादर येथील चैत्यभूमीवर येऊ न शकलेल्या अनुयायांची या वर्षी अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मोठय़ा संख्येने अनुयायी या वेळी दादर चौपाटीस्थित चैत्यभूमीवर दाखल झाले होते. यात सर्वाधिक विदर्भातील अनुयायांची संख्या होती. मध्य प्रदेश, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश येथील अनुयायांनीही यंदा चैत्यभूमीवर उपस्थिती लावल्याचे दिसून आले.

डॉ. आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यासह देशाच्या विविध भागांतून चैत्यभूमीवर दाखल होणाऱ्या अनुयायांना शांतता आणि शिस्तबद्ध पद्धतीने डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अभिवादन करता यावे यासाठी मुंबई पोलिसांसह भारतीय बौद्ध महासभेचे तीन हजार व्यवस्थापक, स्वयंसेवक आणि समता सैनिक दलाचे दोन हजार सैनिक तैनात आहेत.

 करोनाचे निर्बंध हटवल्यानंतर दोन वर्षांनी डॉ. आंबेडकरी अनुयायांची चैत्यभूमी येथे गर्दी होणार हे लक्षात घेऊन तिचे नियोजन करण्याच्या दृष्टीने पोलीस, महानगरपालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पालिकेने ड्रोनची व्यवस्था केली असून त्याच्या मदतीने शिवाजी पार्कवरील गर्दीचा आढावा घेतला जात आहे. चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात १२५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जात आहे. याशिवाय चैत्यभूमी ते वरळी, शिवाजी पार्क, दादर रेल्वे स्थानक, डॉ. आंबेडकर भवन आणि डॉ. बाबासाहेबांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ठिकाणी समता सैनिक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

सूचना फलक..

 महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेने दादर स्थानकात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. दादर स्थानकातून चैत्यभूमी येथे कसे जायचे याचे सूचना फलक स्थानकात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांद्वारे मदत कक्षही उभारण्यात आले आहेत. अनुयायांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी काही पादचारी पूल बंद केले असून पर्यायी मार्ग खुला केला आहे.

वैद्यकीय पथक

 पाचशे वैद्यकीय अधिकारी आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक शिवाजी पार्क परिसरात सज्ज ठेवण्यात आले आहे. अनुयायांना येथे आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध करण्यात आली असून मोफत औषधे पुरवली जात आहे. तसेच १० रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्यक्ष चैत्यभूमीवर येऊ न शकणारय़ा अनुयायांना मंगळवारी परिनिर्वाणदिनी अभिवादन करता यावे, यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून करण्यात येणार आहे.

पालिकेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

महापरिनिवार्ण दिनानिमित्त पालिकेने तयार केलेल्या माहिती पुस्तिकेचे सोमवारी प्रकाशन करण्यात आले. या वर्षीच्या पुस्तिकेत बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील काही जुनी पत्रे, जुनी ऐतिहासिक छायाचित्रे असून संदर्भ म्हणून जपून ठेवता येईल अशा पद्धतीने या माहिती पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशीष शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.

चोख पोलीस बंदोबस्त

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कसह शहरातील विविध ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनाही विशेष सूचना देण्यात आल्या. सुमारे तीन हजार पोलिसांचा फौजफाटा संपूर्ण दादर परिसरात तैनात करण्यात आला आहे. या परिसरात स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.

श्वान आणि बॉम्बशोधक व नाशक पथकातील अधिकाऱ्यांनाही दादर परिसरात तैनात करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांसह महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली आहे. वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून दादर परिसरातील काही वाहतूक एक दिशा मार्ग तर काही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही. तसेच वाहतूक पोलिसांनाही योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या वेळी काही ठिकाणी वाहने उभी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गर्दीचा फायदा घेऊन काही भुरटे चोर सोनसाखळी, पाकीटमारीचे गुन्हे करीत असल्याने साध्या वेशातील काही पोलिसांना तिथे तैनात करण्यात आले आहे. शिवाजी पार्क परिसरात सीसीटीव्हींच्या मदतीने संपूर्ण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. महिलांच्या छेडछाडीचे प्रकार होऊ नयेत म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 00:42 IST

संबंधित बातम्या