scorecardresearch

मुंबईत वातानूकुलीत लोकलमध्ये ‘फुकट्यांची’ गर्दी

विना तिकीट प्रवाशांवर मध्य रेल्वेकडून तिकीट तपासनीसांच्या मदतीने विशेष मोहीम हाती घेऊन कारवाई केली जात आहे. त्यानंतरही विना तिकीट प्रवाशांच्या संख्येत घट झालेली नाही.

मुंबईत वातानूकुलीत लोकलमध्ये ‘फुकट्यांची’ गर्दी
(संग्रहित छायाचित्र)

वातानूकुलीत लोकल प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर मध्य रेल्वेवरील या लोकलमध्ये ‘फुकट्या’ प्रवाशांची गर्दी अधिक होत आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत वातानूकुलीत लोकलमधून प्रवास करणाऱ्या तब्बल २० हजार १०४ प्रवाशांकडे योग्य तिकीट नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे या प्रवाशांवर विना तिकीट प्रवासी म्हणून कारवाई करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

हेही वाचा- मुंबई: नव्या वर्षात मेट्रो १२ सह मेट्रो ५ च्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणार

सध्या मध्य रेल्वेवर वातानूकुलीत लोकलच्या रोज ५६ फेऱ्या सीएसएमटी-ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळा दरम्यान होतात. सध्या या लोकलमधून दररोज २ लाख ७० हजार ७७८ प्रवासी प्रवास करतात. एप्रिलमध्ये वातानूकुलीत लोकलमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ५१ हजार १७० होती. मे महिन्यापासून तिकीट दरात कपात करण्यात आली आणि प्रवासी संख्येत वाढ़ होऊ लागली. मात्र या प्रवाशांव्यतिरिक्त विना तिकीट किंवा सामान्य लोकलचे तिकीट किंवा पासवरही वातानूकुलीत लोकलमधून प्रवास करणाऱ्याची संख्या अधिक आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी काही वातानूकुलीत लोकल फेऱ्यांना गर्दी होते. परिणामी वातानूकुलीत लोकलचे तिकीट किंवा पास काढून प्रवास करणाऱ्यांना गर्दीला तोंड द्यावे लागते. सायंकाळी ६.१० वाजताची सीएसएमटी-ठाणे वातानूकुलीत जलद लोकल, ६.१८ वाजताची सीएसमटी-डोंबिवली, सायंकाळी ६.३६ ची सीएसएमटी-कल्याण जलद लोकल, रात्री ८ वाजताची सीएसएमटी-कल्याण, सकाळी ८.३३ ची टिटवाळा-सीएसएमटी, सकाळी ८.५४ ची कल्याण-सीएसएमटी यांसह अन्य काही फेऱ्यांना प्रवाशांची गर्दी होत असून मधल्या स्थानकातून लोकल पकडणाऱ्या आणि वातानुकुलीतचे योग्य तिकीट असणाऱ्या प्रवाशांना बसण्यासही जागा मिळत नाही.

विना तिकीट प्रवाशांवर मध्य रेल्वेकडून तिकीट तपासनीसांच्या मदतीने विशेष मोहीम हाती घेऊन कारवाई केली जात आहे. त्यानंतरही विना तिकीट प्रवाशांच्या संख्येत घट झालेली नाही. तिकीट तपासनीसांच्या अपुऱ्या संख्येमुळे वातानुकुलीत लोकलमध्ये तिकीट तपासनीसाचीही नेमणूक करता येत नाही. त्यामुळे विना तिकीट प्रवाशांचे चांगलेच फावले आहे.

हेही वाचा- चार्ल्स शोभराजला पहिल्यांदा अटक करणारा ‘मराठमोळा’ अधिकारी! बेड्या नसताना ‘ही’ युक्ती लढवून केलं जेरबंद

जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत वातानूकुलीत लोकलचे तिकीट नसणाऱ्या प्रवाशांवर केलेल्या कारवाईत मध्य रेल्वेने ३८ लाख ७९ हजार रुपये दंड वसुल केला आहे. जानेवारीत ९९५ विना तिकीट प्रवासी आढळले होते. त्यानंतर जूनमध्ये २ हजार ८५८ विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. सप्टेंबरमध्ये कारवाई आणखी तीव्र केल्याने ३ हजार ५७९ प्रवाशांना पकडण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात १ हजार ७२० प्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. डिसेंबरमध्येही कारवाई आणखी तीव्र केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा- मुंबई: गिरणी कामगार घर सोडत-२०२०; पात्र गिरणी कामगार, वारसांना तात्पुरते ऑनलाईन देकार पत्र

मध्य रेल्वेवर १९ ऑगस्टपासून आणखी दहा वातानूकुलीत लोकल फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. ठाणे ते सीएसएमटी दरम्यान अप-डाउन मार्गावर चार फेऱ्या, बदलापूर-सीएसएमटी दरम्यान अप-डाउन चार फेऱ्या, कल्याण-सीएसएमटी अप डाउन दोन फेऱ्यांचा समावेश होता. प्रवाशांच्या वाढत्या विरोधामुळे या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या दहा फेऱ्या सध्या तरी सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा कोणताही विचार नाही.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 16:50 IST

संबंधित बातम्या