इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात (राणीची बाग) नवनवीन प्राणी दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. करोना व टाळेबंदीमुळे घसरलेले प्राणी संग्रहालयाचे उत्पन्न पुन्हा एकदा वाढले आहे. नोव्हेंबरपासून मार्चच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत साडेसहा लाखांहून अधिक पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली आहे. या कालावधीत अडीच कोटी रुपयांहून अधिक महसूल जमा झाला आहे. केवळ पाचच महिन्यात पन्नास टक्के महसूल जमा झाला आहे.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल

पेंग्विनच्या आगमनानंतर प्राणीसंग्रहायलयाचा महसूल आणि पर्यटकांची संख्या एकदम वाढली होती. मात्र, दोन वर्षांनी हा भरदेखील ओसरू लागला होता. त्यातच मार्च २०२० मध्ये टाळेबंदी लागू झाल्यानंतर प्राणीसंग्रहायलयही पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते.

नोव्हेंबर २०२१ मध्ये दुसरी लाट ओसरल्यानंतर प्राणी संग्रहायलय पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र तिसऱ्या लाटेत करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर पुन्हा एकदा जानेवारी २०२२ मध्ये प्राणीसंग्रहालय महिनाभर बंद ठेवण्यात आले होते. आता पुन्हा प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी सुरू असून पर्यटकांचा ओघ वाढला आहे. पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल सहा लाख ७७ हजाराहून अधिक पर्यटकांनी प्राणीसंग्रहायलयाला भेट दिली. त्यामुळे २ कोटी ६९ लाख ८६ हजार रुपयांहून अधिक महसूल जमा झाला असल्याची माहिती प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. पालिकेला आतापर्यंत वार्षिक जास्तीत जास्त साडेपाच कोटी रुपये महसूल करोनापूर्व काळात मिळाला आहे.

करोनापूर्वकाळात प्राणीसंग्रहालयात केवळ पेंग्विन हेच एक आकर्षण होते. मात्र आता शक्ती, करिश्मा ही वाघाची जोडी,  अस्वल, हरणे, अजगर, तरस आणि विविध प्रकारचे पक्षीही पाहायला मिळत आहेत. प्राणीसंग्रहालयात सध्या नऊ पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. या शिवाय २८३ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षीही आहेत.

राणी बागेला दररोज सहा ते सात हजार पर्यटक भेट देत असून शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी तर पर्यटकांची संख्या २१ हजारांपर्यंत पोहोचते. राणी बागेत पेंग्विन दाखल होताच पर्यटकांची संख्या साधारण ४० हजारापर्यंत पोहोचली होती. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता एक तिकिट खिडकी वाढवली असून तिकिट खिडक्यांची संख्या ४ करण्यात आली आहे. दरवर्षी येथे साधारण १२ लाखापर्यंत पर्यटक भेट देतात. पेंग्विनमुळे पर्यटकांची संख्याही वाढली. तसेच शुल्क वाढविल्यामुळे महसुलातही मोठी भर पडली आहे. सध्या लहान मुलांना २५ रुपये, प्रौढांना ५० रुपये तर कौंटुंबिक सहलींना एकत्रित १०० रुपये असे शुल्क आहे.