मुंबई: क्रूझ पार्टी प्रकरणात अमली पदार्थ नियंत्रण विभागाने(एनसीबी) आतापर्यंत २० आरोपींना अटक केल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्राबाहेर पोहोचला आहे. जप्त करण्यात आलेल्या इक्स्टसीचा मूळ विक्रेता परराज्यातील असल्याची माहिती एनसीबीला मिळाली असून त्याचा शोध सुरू आहे. 

एनसीबीने या प्रकरणात अटक केलेला नायजेरियन वितरक चिनेदु इग्वे हा इक्स्टसी म्हणजे एमडीएमएचा वितरक आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट यांच्या मोबाइलवरून महत्त्वपूर्ण संभाषण एनसीबीच्या हाती लागले होते.

 त्यात अचित कुमारसोबत झालेल्या संभाषणावरून एनसीबीने चिनेदुला अटक केली होती. त्याच्याकडून गांजा पकडण्यात आला होता.

 अचितकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर अंधेरी येथे छापा टाकून चिनेदु इग्वे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एमडीएमएच्या ४० गोळ्या सापडल्या होत्या. त्यात पॉपीन म्हणून प्रसिद्ध असलेले १५ ग्रॅम एमडीएमए हे पार्टी ड्रग्ज सापडले आहे.