मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकासासाठी सुरू असलेल्या ७५ दिवसांच्या वाहतूक आणि पॉवर ब्लॉकमुळे दादरपर्यंत मर्यादित करण्यात आलेल्या तीन एक्स्प्रेस आता पुन्हा सीएसएमटीपर्यंत धावणार आहेत. त्यामुळे अमरावती, लातूर आणि बीदरहून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाकडून (आरएलडीए) फलाट क्रमांक १४ आणि १५, तसेच स्टेबलिंग लाइन क्रमांक १५ येथे पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबरदरम्यान ७५ दिवसांचा वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत काही गाड्यांच्या सेवेत बदल करण्यात आले असून काही गाड्या दादरपर्यंतच चालवण्यात येत आहेत. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन गाडी क्रमांक १२११२ अमरावती – सीएसएमटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२१०८ लातूर – सीएसएमटी एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक २२१४४ बीदर – सीएसएमटी एक्स्प्रेस या तीन रेल्वेगाड्यांची सेवा आता सीएसएमटीपर्यंत पूर्ववत करण्यात आली आहे. यापूर्वी या गाड्यांची सेवा दादरपर्यंतच मर्यादित करण्यात आली होती.
रेल्वेगाड्यांच्या फलाटामध्ये बदल होण्याची शक्यता
- ब्लॉक सुरू असतानाही या तीन रेल्वेगाड्यांना सीएसएमटीपर्यंत प्रवेश दिला जाणार असला तरी फलाट क्रमांक १४ आणि १५ कामांमुळे उपलब्ध नसेल. त्यामुळे संबंधित रेल्वेगाड्या सीएसएमटीतील अन्य उपलब्ध फलाटावर वळवण्यात येणार आहेत. परिणामी, रेल्वेगाड्यांच्या फलाटामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
- दादरपर्यंत सेवा मर्यादित झाल्याने प्रवाशांना दादर येथे उतरून पुढील प्रवास करावा लागत होता. आता तिन्ही रेल्वेगाड्या थेट सीएसएमटीपर्यंत धावणार असल्याने हा अतिरिक्त प्रवास टळणार आहे. प्रवाशांनी गाडीचे आगमन आणि फलाटाची अद्ययावत माहिती स्थानकातील उद्घोषणा व माहिती फलकांवरून घेण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
