मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक फोर्ट परिसराचे ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्य जपण्याबरोबरच या भागातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी मुंबई महापालिकेने उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये पदपथांच्या एकसमान सुशोभीकरणाच्या कामांतर्गत पुढील टप्प्यात सीएसएमटी परिसरातील दादाभाई नौरोजी मार्गावरील पदपथाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या पदपथावर काळ्या दगडी लाद्या बसवण्यात येणार आहेत. यामुळे सीएसएमटी स्थानक ते क्रॉफर्ड मार्केटदरम्यानच्या रस्त्यावरील पदपथाचे रुप पालटणार आहे.
फोर्ट परिसराला वसाहतकालीन इतिहास, कला आणि वास्तुकलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. या परिसराचा २०१८ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश झाला. या पार्श्वभूमीवर परिसराचे ऐतिहासिक स्वरूप कायम ठेवून नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. फेब्रुवारी २०१९ मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. मात्र, करोनामुळे हा प्रकल्प लांबला. या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात आता सीएसएमटी स्थानकाबाहेरील दादाभाई नौरोजी मार्गावरील पदपथाची सुधारणा करण्यात येणार आहे.
पर्यटकांचे आकर्षण
– दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक फोर्ट परिसराचे ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्य जपण्याबरोबरच या भागातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या पदपथांच्या एकसमान सुशोभीकरणाच्या कामातील काही टप्पे पूर्ण केले आहेत.
– नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) आणि मुंबई विद्यापीठाच्या मागील बाजूच्या पदपथांचे एकसमान स्वरूपात नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता डी. एन. रोड येथील पदपथाची सुधारणा करण्यात येणार आहे.
– मुंबईची जडणघडण, नियोजन हे फोर्ट विभागातून झाले. त्यामुळे या विभागातील प्रत्येक इमारतीची एक वेगळी स्थापत्यशैली असून सर्व इमारती देखण्या व प्रमाणबद्ध आहेत. या परिसरातील बँकाच्या इमारती, मैदाने, व्यापारी विभाग, प्रशासनीय व सरकारी इमारती या स्वतंत्र भागात असून रुंद पदपथ आहेत. त्यामुळे हा विभाग नेहमीच पर्यटकांचे आकर्षण राहिला आहे. परिसराच्या प्रतिमेचे महत्त्व जाणून पदपथावर बेसॉल्ट दगडाच्या लाद्या ‘हेरिटेज लेन’चे स्वरूप देण्याचा प्रयत्न
या प्रकल्पांतर्गत पदपथांचे एकसमान स्वरूप, जाहिरात फलक, बसथांबे, झाडांभोवतालच्या जागा यांची पुनर्रचना करण्यात येत आहे. या कामाचा एक भाग म्हणून एनजीएमएबाहेर पारदर्शक काचेच्या आवरणाचा प्रायोगिक बसथांबा उभारण्यात आला आहे. त्याचप्रमाणे डी. एन. रोड येथील बसथांबाही पारदर्शक साहित्याने तयार केला जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील इमारतींची दृश्यमानता वाढणार आहे. या प्रकल्पांतर्गत पालिकेने आतापर्यंत काही टप्पे पूर्ण केले आहेत. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) आणि मुंबई विद्यापीठाच्या मागील बाजूच्या पदपथांचे एकसमान स्वरूपात नूतनीकरण करण्यात आले आहे. या परिसराला ‘हेरिटेज लेन’चे स्वरूप देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
