दक्षिण मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसराचा आता न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरच्या धर्तीवर ‘मेकओव्हर’ केला जाणार आहे. या परिसरात पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार केली जाणार असून मुंबईतील आणखी ९ जंक्शनवरही अशाच प्रकारच्या सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिका, वाहतूक पोलीस आणि ‘ब्लुमबर्ग’च्या ग्लोबल रोड सेफ्टी या उपक्रमाअंतर्गत मुंबईत सुरक्षित प्रवासासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहे. यासाठी १९ जंक्शनवरील वाहतुकीचा अभ्यास करुन अहवाल तयार करण्यात आला आहे.
या अंतर्गत मुंबईतील सर्वाधिक वर्दळ असलेल्या १० जंक्शनचा आगामी काळात मेकओव्हर केला जाईल. यात मुंबईतील सीएमएमटी परिसर, एलबीएस मार्ग, बेलासिस मार्ग यांचाही समावेश आहे. या ठिकाणी अपघातांच्या शक्यतेचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

सीएसएमटी परिसरासाठीचा आराखडा तयार करताना जागेची उपलब्धता, पादचारी आणि वाहनांची संख्या याचा विचार करण्यात आला आहे. सध्याच्या वाहनांच्या मार्गिकेला हात न लावता पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका, फूड प्लाझा सुरु करण्यात येणार आहे.

टाइम्स स्क्वेअर आणि सीएसएमटी परिसरातील साम्य
ग्लोबल रोड सेफ्टी या उपक्रमासाठी न्यूयॉर्कमधील माजी वाहतूक आयुक्त जॅनेट सादिक खान या देखील काम करतात. त्यांनी टाइम्स स्क्वेअरचा चेहरामोहराच बदलला होता. ‘टाइम्स स्क्वेअरला तासाला तीन लाख पादचारी ये-जा करतात. पण त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिकाच नव्हती. यामुळे अपघात व्हायचे. यात आम्ही बदल करण्याचा निर्णय घेतला आणि पादचाऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या’ असे त्यांनी सांगितले. मुंबईतील सीएसएमटी परिसरातही तासाला एक लाख पादचारी ये-जा करतात. या पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका, सायकलस्वारांसाठी कॉरिडोर तयार केले जातील.