विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी ३१ जुलैला हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर बोरीवली-गोरेगाव दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

पश्चिम रेल्वेच्या बोरीवली ते गोरेगाव दरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लाॅकवेळी या दोन्ही स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे दरम्यानही दोन्ही मार्गावरही सकाळी ११.१० पासून सायंकाळी ४.४० पर्यंत ब्लाॅक असेल. त्यामुळे सीएसएमटी, वडाळा-वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगाव दरम्यानच्या अप-डाऊन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल-कुर्ला दरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावतील. ठाणे-वाशी, नेरुळ अप-डाऊनवरही सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. या स्थानकादरम्यानच्या लोकल फेऱ्याही रद्द करण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गावर मात्र मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही.