मुंबई : देशभरात ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या यशानंतर आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना शयनयान (स्लीपर) सुविधा असलेली वंदे भारत उपलब्ध करण्यात आली आहे. मुंबई – बंगळुरू वंदे भारत शयनयान एक्स्प्रेसला मंजुरी देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ही देशातील दुसरी वंदे भारत शयनयान एक्स्प्रेस ठरणार आहे.
ही अत्याधुनिक एक्स्प्रेस केएसआर बंगळुरू सिटी रेल्वे स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान धावणार आहे. सध्या रेल्वेने वेळापत्रक जाहीर केले नसले तरी मुंबई – बंगळुरू प्रवास १६ तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रेल्वेमंत्र्यांनी खासदार पी. सी. मोहन यांना पाठवलेल्या पत्रात या नव्या सेवेला मंजुरी दिल्याचे स्पष्ट केले आहे. जनतेच्या सोयीसाठी बंगळुरू आणि मुंबई दरम्यान नवीन वंदे भारत शयनयान एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘वंदे भारत’मधील ही शयनयान एक्स्प्रेस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खास संरचित करण्यात येत असून, यामध्ये अत्याधुनिक डबे, सुधारित सुरक्षा प्रणाली, स्वच्छता आणि आरामदायी शयनयानाची सुविधा असेल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
देशातील बहुतेक राज्यांमध्ये यापूर्वीच ‘वंदे भारत’ धावत असून, या गाड्यांमुळे रेल्वे प्रवासात मोठी सुधारणा झाली आहे. जलद गती, स्वच्छता आणि आधुनिक सुविधा यामुळे प्रवाशांना कमी वेळेत इच्छीतस्थळी पोहोचता येत आहे. आता शयनयान ‘वंदे भारत’मुळे रात्रीच्या प्रवासासाठीही आरामदायी आणि वेगवान पर्याय उपलब्ध होणार आहे. या नव्या गाडीमुळे व्यावसायिक, विद्यार्थी आणि नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होईल.
रेल्वेमंत्र्यांची मंजूरी
केएसआर बंगळूरू ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान ‘वंदे भारत शयनयान’ एक्स्प्रेसची सेवा सुरू करण्यास रेल्वे मंत्र्यांनी मंजुरी दिली. लवकरच या गाडीचे थांबे, वेळापत्रक आणि भाडे जाहीर करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
दोन शयनयान वंदे भारत रेक?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गासाठी दोन शयनयान वंदे भारत रेक तैनात करण्यात येण्याची शक्यता आहे. यापैकी एक रेक मुंबईहून, तर दुसरा बंगळुरूवरून सुरू होईल. ज्यामुळे या दोन प्रमुख महानगरांदरम्यान दररोज रात्रभर ये-जा करणारी सेवा शक्य होईल.
मुंबई-बंगळुरूदरम्यान दुसरी वंदे भारत शयनयान सेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी जानेवारीमध्ये पश्चिम बंगाल आणि आसामला जोडणाऱ्या, हावडा आणि गुवाहाटी (कामाख्या) दरम्यानच्या भारतातील पहिल्या वंदे भारत शयनयान सेवेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर, मुंबई-बंगळुरू सेवा हा देशातील दुसरा वंदे भारत शयनयान कॉरिडॉर ठरला आहे.
अन्य एक्स्प्रेस
सध्या, बंगळुरू आणि मुंबईदरम्यान उद्यान एक्स्प्रेस दैनिक रेल्वेगाडी आहे. ही एक्स्प्रेस गुंटकल आणि कलबुर्गीमार्गे धावते आणि १,१३६ किमी अंतर कापते. प्रामुख्याने आंध्र प्रदेशला सेवा देते. या एक्स्प्रेसला बंगळुरू – मुंबई जाण्यासाठी २३ तास ३५ मिनिटे आणि परत येण्यासाठी २१ तास ५० मिनिटे लागतात. याव्यतिरिक्त, एक एलटीटी – एसएमव्हीबी साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी देखील आहे.
मुंबईहून बंगळुरूमार्गे जाणाऱ्या इतर गाड्यांमध्ये तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस (दररोज), एलटीटी – कोयंबतूर एक्स्प्रेस (दररोज), दादर पुद्दुचेरी एक्स्प्रेस आणि दादर – तिरूनेलवेली एक्स्प्रेस (दोन्ही आठवड्यातून तीन वेळा) यांचा समावेश आहे. तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस ही सर्वात वेगवान असून, तिला १८ तास ४४ मिनिटे लागतात.
