मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) – कुर्ला दरम्यानच्या पाचवी व सहावी रेल्वे मार्गिका गेली तब्बल १६ वर्षे प्रलंबित आहे. याबाबत ‘लोकसत्ता’ने ‘गर्दीमुक्त प्रवासाची प्रतीक्षाच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर मध्य रेल्वेने कुर्ला-परळ पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेदरम्यान सुमारे ५०० बांधकामावर तोडक कारवाई केली. परिणामी, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला गती मिळाली.

लोकल, मेल-एक्स्प्रेसचा वक्तशीरपणा वाढविण्यासाठी, लोकल सेवेत भर करण्यासाठी सीएसएमटी – कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका प्रकल्प मंजूर करण्यात आला. परंतु, भूसंपादन, रहिवाशांचे पुनर्वसन, प्रशासकीय मंजुरी आणि निधीची उपलब्धता या कारणांमुळे प्रकल्प रखडला. या प्रकल्पाचे काम वेगात करण्यासाठी त्याची दोन टप्प्यात विभागणी करण्यात आली. कुर्ला ते परळ १०.१० किमी आणि परळ ते सीएसएमटी ७.४ किमी असे दोन टप्पे करण्यात आले. परंतु, भूसंपादन करण्यास विलंब होत असल्याने प्रकल्पाला गती मिळू शकली नाही. याबाबत ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रशासनाने प्रकल्पातील अडथळे दूर करण्यास सुरुवात केली. शीव – माटुंगादरम्यान सुमारे ४९६ बांधकामावर तोडक कारवाई केली.

शीव – माटुंगादरम्यान एकूण ६२५ झोपड्या, बांधकामे उभी होती. यापैकी सुमारे ५०० हून अधिक बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला. या कारवाईमुळे १,८८० चौ.मी. परिसर मोकळा झाला. याव्यतिरिक्त १,२१० चौ.मी जागेवरील बांधकामे तोडण्यात येत आहेत. टाटा कंपनीच्या उच्च दाब वीजवाहिन्या आणि टाॅवर अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या जोडणीसाठी ३,८०० चौ.मी. जमीन आवश्यक आहे, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

हार्बर मार्गासाठी कुर्ला येथे १.३ किमी लांबीच्या रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलाचे आतापर्यंत ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. कुर्ला येथे ओएचई कारखाना आणि इतर कार्यालयांचे बांधकाम सुरू आहे. शीव आणि माटुंगादरम्यान इमारतीचे बांधकाम, शीव उड्डाणपुलाचे तोडकाम आणि त्याच्या पुनर्बांधणीचे काम करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दादर येथील पश्चिमेकडील बाजूला दोन नवीन फलाट बांधण्यासाठी जागा तयार करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील सुमारे २१ वसाहतीचे स्थलांतर करणे अपेक्षित आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या ८,५५४.७२ चौ.मी. जमिनीचे मध्य रेल्वेला हस्तांतरण करणे अपेक्षित आहे. पश्चिम रेल्वेच्या वसाहतीच्या स्थलांतरासाठी मध्य रेल्वेने २१ कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. मध्य रेल्वेने दादर येथे पश्चिम रेल्वेच्या ८,५५४.७२ चौ.मी. जमिनीऐवजी करी रोड डेपोमधील ५,०४२ चौ.मी जमीन पश्चिम रेल्वेला हस्तांतरित केली आहे. पश्चिम रेल्वेकडून मध्य रेल्वेला जमीन हस्तांतरण करणे प्रलंबित आहे.