मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील (सीएसएमटी) गर्दीत आई आणि दोन मुलांची ताटातूट झाली. लोकल प्रवाशांच्या धावपळीत दोन्ही मुले दिसेनाशी झाल्याने त्यांची आई भयभीत झाली. परंतु, रेल्वे चाईल्ड हेल्प डेक्स, रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधानता राखून गर्दी असलेल्या स्थानकात शोध घेऊन एका तासाच्या आत दोन मुलांना सुखरूप त्यांच्या आईच्या स्वाधीन केले.

ठाण्यातील डोंगरी पाडा येथील रहिवासी असलेली एक महिला आपल्या दोन मुलांसह बुधवारी सायंकाळी निघाली. तिने ठाण्याहून लोकलने सीएसएमटी स्थानक गाठले. रात्री ८ च्या सुमारास फलाट क्रमांक ४ वर प्रवाशांच्या प्रचंड गर्दीत मुले आणि आईची चुकामुक झाली. मुले दिसेनाशी झाल्याने आई प्रचंड घाबरली. त्यावेळी त्यांना फलाटावर प्रवासी निधी कामत भेटल्या. त्यांनी तातडीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेल्वे चाईल्ड हेल्प डेस्कशी मदत क्रमांक १०९८ वरून संपर्क साधला. त्यानंतर तातडीने रेल्वे चाईल्ड हेल्प डेस्कचे पथक फलाटावर दाखल झाले. आईला सुरक्षितपणे कार्यालयात आणून तिचे सांत्वन करण्यात आले. चाईल्ड हेल्प लाईन पर्यवेक्षक सचिन बिऱ्हाडे आणि प्रकल्प समन्वयक नितीन दिक्षित यांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली.

१० वर्षीय मुलाने काळ्या रंगाचे कपडे आणि ११ वर्षीय मुलीने गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले होते. या वर्णनावरून रेल्वे पोलिस दलातील हवालदार मनिषा जाधव यांच्या मदतीने सीएसएमटीवरील सर्व फलाटावर शोध घेण्यात आला. स्थानकावर वारंवार उद्घोषणा करण्यात आली. काही वेळातच दोन्ही मुले फलाटावर फिरताना आढळली.

मुले समोर येताच त्यांनी आईला मिठी मारली. जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या नियमानुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, दोन्ही मुलांना बुधवारी रात्री ९ च्या सुमारास आईच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर हे कुटुंब फलाट क्रमांक १५ वरून रेल्वेगाडीने आपल्या गावला रवाना झाले.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष अंतर्गत ‘रेल्वे चाईल्ड हेल्प डेस्क’ रेल्वे स्थानकांवरील मुलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कुटुंबाशी पटत नसल्याने भांडण करून घरातून निघून जाणाऱ्या अल्पवयीन मुलांची संख्या अधिक असते. मुंबई मायानगरीचे आकर्षक असल्याने अनेकजण मुंबईच्या दिशेने येतात. परंतु, अनोळखी शहरात येऊन, प्रवाशांची गर्दी पाहून अल्पवयीन मुले घाबरतात. अशा मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्याचे काम ‘रेल्वे चाईल्ड हेल्प डेस्क’, रेल्वे पोलीस, आरपीएफ व इतर सुरक्षा विभाग करीत आहे.

चाईल्ड हेल्प लाइन क्रमांक १०९८ ची माहिती देणारे फलक प्रत्येक ठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच लोकल डब्यातही क्यूआर कोडद्वारे चाईल्ड हेल्प लाइनबाबत जनजागृती केली जाते.