Mumbai Railway CSMT : मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या रेल्वे स्थानकावरून दररोज शेकडो ट्रेन धावतात आणि हजारो प्रवासी प्रवास करतात. आता याच सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या प्रत्येक रेल्वेत ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा नारा घुमण्याची शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली आहे.
सीएसएमटी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा उद्घोषणा करण्यात याव्यात, अशी मागणी राहुल नार्वेकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. या संदर्भात नार्वेकर यांनी मंत्री वैष्णव यांना एक पत्र देखील दिलं आहे.
राहुल नार्वेकर यांनी काय मागणी केली?
“दिल्ली दौऱ्यादरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ये-जा करणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीच्या उद्घोषणांमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ या जयघोषांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे”, अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.
“सीएसएमटी (CSMT) हे केवळ मुंबईचे ऐतिहासिक रेल्वे स्थानक नसून छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, स्वराज्य, लोककल्याण आणि राष्ट्रहिताच्या विचारांचे प्रतीक आहे. देशाच्या विविध भागांतून दररोज हजारो प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा आणि स्वराज्याच्या विचारांचा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याच्या दृष्टीने ही मागणी महत्त्वपूर्ण आहे”, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
“केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित रेल्वे प्रशासनाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि स्वराज्याच्या विचारांचा जयघोष देशभर पोहोचवण्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल असा मला विश्वास आहे”, असंही राहुल नार्वेकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
