मुंबई : कोकणवासियांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली असून मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) – सावंतवाडी रोड दैनंदिन एक्स्प्रेस गुरुवारी मार्गस्थ झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
सीएसएमटीहून दुपारी १२.५० वाजता या एक्सप्रेसने आपला पहिला प्रवास सुरू केला आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही दुरदृश्यप्रणालीने या सोहळ्याला उपस्थिती लावली. गाडी क्रमांक ०१००१ सीएसएमटी – सावंतवाडी रोड दैनंदिन एक्स्प्रेसचा उद्धाटन सोहळा सीएसएमटी स्थानकात पार पडला. सीएसएमटीहून दुपारी १२.५० वाजता ही गाडी मार्गस्थ झाली.ही रेल्वेगाडी मध्यरात्री २ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचणार आहे. उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री नितेश राणे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, खासदार मिलिंद देवरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईहून दक्षिण कोकणात जाणाऱ्या रेल्वे सेवेत ही महत्त्वाची भर मानली जात असून यामुळे नियमित दैनंदिन प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
या स्थानकांवर थांबा
दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.
२१ डब्यांची संरचना
या रेल्वेगाडीत एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, दोन वातानुकूलित द्वितीय, तीन वातानुकूलित तृतीय, चार शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी, गार्ड्स ब्रेक व्हॅनसह द्वितीय आसनाचा एक डबा आणि एक जनरेटर व्हॅन अशी एकूण २१ डब्यांची रचना आहे.
कोकणाला काय फायदा?
– सीएसएमटीहून सावंतवाडीसाठी थेट दैनंदिन रेल्वे सेवा.
– कणकवली, कुडाळ आणि सिंधुदुर्ग परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा.
– तारकर्ली, आंबोली आणि गोवा सीमावर्ती पर्यटनाला चालना.
– व्यापारी, नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी नियमित प्रवासाची सुविधा.
– लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादरहून कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवरील गर्दी विभाजित होण्यास मदत.
– मध्य रेल्वेने या गाडीच्या नियमित वेळापत्रक आणि आरक्षणासंदर्भातील सविस्तर माहिती स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
