मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील रेल्वे पोलीस ठाणे परिसरात लावण्यात आलेले जनजागृतीचे फलक फक्त हिंदी भाषेत असल्याने, मराठी एकीकरण समितीने त्याविरोधात लेखी निवेदन दिले आहे. महाराष्ट्र अधिकृत भाषा अधिनियम, १९६४ चे पालन करून संबंधित हिंदी फलक तत्काळ हटवून त्याऐवजी मराठी भाषेतील फलक लावावेत, अशी मागणी समितीने केली आहे.
समितीने सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच मध्य रेल्वे पोलीस उपायुक्त यांना हे निवेदन दिले. राज्यातील सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक सूचना, जनजागृती मोहिमा आणि फलकांवर मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करणे बंधनकारक आहे. असा नियम असताना केवळ हिंदी भाषेतील फलक लावणे हे महाराष्ट्र अधिकृत भाषा अधिनियमाच्या मसुद्याशी विसंगत असल्याचा दावा केला आहे. समितीच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील अधिकृत भाषा असलेल्या मराठीला सार्वजनिक ठिकाणी दुय्यम स्थान मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होऊ शकते. त्यामुळे राज्याची भाषिक ओळख आणि मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी कायद्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
समितीची मागणी सध्या असलेले हिंदीतील फलक तत्काळ काढून टाकणे, त्याऐवजी मराठी भाषेतील (आवश्यक असल्यास इतर भाषांसह) नवीन फलक लावणे आणि भविष्यात अशा सर्व फलकांवर महाराष्ट्र अधिकृत भाषा अधिनियमाचे पालन सुनिश्चित करणे, यांचा समावेश आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी आणि त्याबाबत लेखी माहिती द्यावी, अशी मागणी समितीने केली. अन्यथा, कायदेशीर मार्गाने पुढील कार्यवाही करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
