मुंबई : मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पुनर्विकास प्रकल्पासाठी फलाट क्रमांक १६ आणि १७ वरील वाहतूक आणि पॉवर ब्लॉकची मुदत १३ जून २०२६ पर्यंत वाढवली आहे. या कामामुळे निवडक मेल आणि एक्स्प्रेस दादर आणि ठाणे येथे अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.

रेल्वे लँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटीने (आरएलडीए) सीएसएमटीच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले असून, सीएसएमटी स्थानकावरील फलाट क्रमांक १६ आणि १७ वर पायाभूत सुविधा उभारणीसह विविध तांत्रिक कामे केली जात आहेत. यापूर्वी १ फेब्रुवारी ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान हा ब्लॉक लागू करण्यात आला होता. त्यानंतर तो १९ मेपर्यंत वाढवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा ब्लॉकला मुदतवाढ देण्यात आली असून आता १३ जूनपर्यंत ब्लॉक असणार आहे.

या ब्लॉकमुळे १३ जून २०२६ रोजी प्रवास सुरू करणाऱ्या काही महत्त्वाच्या गाड्या सीएसएमटीपर्यंत न जाता दादर आणि ठाणे येथेच थांबवण्यात येतील. सीएसएमटीच्या आधुनिकीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हे ब्लॉक अत्यावश्यक आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि देखभालीच्या कामांसाठी ही उपाययोजना करण्यात येत आहेत, असे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दादर येथे अंशतः रद्द होणाऱ्या रेल्वेगाड्या

– गाडी क्रमांक १२११२ अमरावती – सीएसएमटी एक्स्प्रेस

– गाडी क्रमांक ११००२ बल्लारशाह – सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस

– गाडी क्रमांक १२८१० हावडा – सीएसएमटी एक्स्प्रेस

– गाडी क्रमांक ११०२० भुवनेश्वर – सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस

– गाडी क्रमांक २२१४४ बिदर – सीएसएमटी एक्स्प्रेस

– गाडी क्रमांक २२१०८ लातूर – सीएसएमटी एक्स्प्रेस

– गाडी क्रमांक २२१२० मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस

ठाणे येथे अंशतः रद्द होणारी रेल्वेगाडी

– गाडी क्रमांक १२१३४ मंगळूर – सीएसएमटी एक्स्प्रेस