मुंबई : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे आरपीएफ कर्मचाऱ्यांनी लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीतून प्रवास करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशाच्या सामानाची बॅगेज स्कॅनरद्वारे तपासणी केली. या बॅगमध्ये कात्री आढळली. आरपीएफ कर्मचाऱ्याने बॅगमधून कात्री घेऊन जाण्यास मनाई असल्याचे सांगितले आणि प्रवाशाकडून एक हजार रुपये दंड वसूल केला. मात्र दंड वसूल केल्यानंतर प्रवाशाला पावती देण्यात आली नाही.
सीएसएमटीवरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस, आरपीएफ तैनात आहेत. रेल्वे स्थानकात, टर्मिनसवर कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी प्रत्येकावर करडी नजर ठेवली जाते. संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास त्याची विचारपूस, तपासणी केली जाते. महत्त्वाच्या रेल्वे स्थानकात यासाठी जादा पोलीस ताफा तैनात असतो. तसेच प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी बॅग स्कॅनर ठेवण्यात आले आहेत. सीएसएमटी येथून २० फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० च्या सुमारास बाहेरगावी जाण्यासाठी महिला प्रवासी निघाली होती. यावेळी बॅग स्कॅनरमध्ये बॅगची तपासणी करताना त्यात कात्री आढळली. यावेळी आरपीएफ कर्मचाऱ्याने कात्री घेऊन जाण्यास मनाई केली. तसेच कर्मचाऱ्याने महिलेला कात्री कचऱ्याच्या डब्यात फेकण्यास सांगितले. त्यानंतर कर्मचाऱ्याने महिलेला कारवाईची भिती घालून दंड भरण्यासाठी दबाव आणला.
या सर्व प्रकारामुळे महिलेने नाईलाजाने एक हजार रुपये दंड भरला. परंतु, याबाबत महिलेला कोणतीही पावती दिली नाही. रेल्वेगाडी पकडायची असल्याने महिला काहीही न बोलता तिथून निघून गेली. काही वेळेनंतर महिलेने रेल्वे पोलीस मदतवाहिनी क्रमांक १५१२ वर संपर्क साधला आणि घडलेल्या प्रकरणाची तक्रार केली. या तक्रारीनंतर सीएसएमटी येथील रेल्वे पोलिसांकडे तक्रार हस्तांतरित केली. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यास सुरुवात केली.
आरपीएफ कर्मचाऱ्याच्या अंगाशी प्रकरण बेतणार असल्याने, त्याने महिलेच्या सीएसएमटी येथील नातेवाइकाला एक हजार रुपये परत केले. तसेच, मदतवाहिनी क्रमांकावर केलेली तक्रार मागे घेण्यास आणि पुढे कोणतीही तक्रार न करण्यास दबाव टाकला आणि प्रकरण मिटवून टाकले. दरम्यान, या घटनेतून आरपीएफ पथकातील काही कर्मचारी प्रवाशांची आर्थिक लूट करीत असल्याचे प्रकार घडत असल्याचे समोर आले. आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून, चौकशी करावी. यात संबंधित आरपीएफ कर्मचारी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.
याप्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे चौकशी केली जाणार आहे, असे सीएसएमटी येथील आरपीएफ अधिकाऱ्याने सांगितले.
