मुंबई : भारतीय रेल्वेने मुंबईस्थित कोकणवासियांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) – सावंतवाडी रोडदरम्यान नवीन नियमित दैनिक एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यास मंजुरी दिली. सुमारे ५१० किमीच्या या मार्गावरील नव्या सेवेचा लाभ दररोज हजारो प्रवाशांना होणार असून पर्यटन, शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि सामाजिक कारणांसाठी प्रवास अधिक सुलभ होणार आहे. गाडी क्रमांक १५०८७ सीएसएमटी – सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड – सीएसएमटी एक्स्प्रेस या नव्या रेल्वेगाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

या नवीन एक्स्प्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर व्यावसायिक थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश आणि दक्षिण कोकणातील प्रमुख शहरांदरम्यान थेट रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे. या सेवेमुळे कोकणातील समुद्रकिनारे, किल्ले, धार्मिक स्थळे आणि निसर्ग पर्यटनस्थळी जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, लघुउद्योजक आणि स्थानिक नागरिकांसाठी मुंबई -कोकणदरम्यान आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे कोकण मार्गावरील वाढत्या प्रवासी मागणीची पूर्तता होण्यास मदत होईल. यासोबतच प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना, प्रवासी वाहतुकीत सुधारणा आणि अधिक सक्षम रेल्वे जाळ्याद्वारे संतुलित विकास साधण्याच्या उद्देशाला बळ मिळणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

दादर – रत्नागिरी रेल्वेगाडी अद्याप बंदच

करोना काळात दादर – रत्नागिरी रेल्वेगाडी बंद होती. त्यानंतर शून्य आधारित वेळापत्रकात वक्तशीरपणा सुधारण्यासाठी मध्य रेल्वेने ही गाडी दिव्यापर्यंतच चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सप्टेंबर २०२१ पासून ही गाडी दिव्यापर्यंत धावते. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, ठाणे, पश्चिम उपनगरे, वसई, विरार, नालसोपारा, गुजरात येथे स्थायिक असणाऱ्या कोकणवासीयांना दिवा येथे जाणे – येणे त्रासदायक आहे. तसेच, दिव्याला जाण्यासाठी रेल्वेशिवाय इतर सोयीस्कर पर्याय नसल्याने लांबून येणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात.

दादर रेल्वे स्थानक – रत्नागिरीदरम्यान पूर्वी धावणारी पॅसेंजर बंद झाल्यापासून मुंबईतील कोकणी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः नोकरी, शिक्षण आणि छोट्या व्यवसायासाठी वारंवार प्रवास करणाऱ्यांना याचा फटका बसत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या एक्स्प्रेसचे भाडे तुलनेने जास्त असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना ते परवडत नाही. त्यामुळे कमी दरातील पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.