मुंबई : मध्य रेल्वेने सीएसएमटी – सावंतवाडी रोड नवीन दैनिक रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ३ सप्टेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेगाडीची फेरी मार्गस्थ होणार आहे. गाडी क्रमांक १५०८७ सीएसएमटी – सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड – सीएसएमटी एक्स्प्रेस या क्रमांकाने दररोज धावेल. सुमारे ५१० किमी मार्गाचा प्रवास या रेल्वेगाडीद्वारे सुरू होणार असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल.

करोना काळात दादर – रत्नागिरी रेल्वेगाडी बंद होती. त्यानंतर शून्य आधारित वेळापत्रकात वक्तशीरपणा सुधारण्यासाठी मध्य रेल्वेने ही गाडी दिव्यापर्यंतच चालवण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबर २०२१ पासून ही गाडी दिव्यावरून सुटते आणि तिथेच थांबते. त्यामुळे दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, ठाणे, पश्चिम उपनगरे, वसई, विरार, नालसोपारा, गुजरात येथे स्थायिक असलेल्या कोकणवासीयांना दिवा येथे जाणे – येणे त्रासदायक झाले आहे. त्यामुळे गेल्या ही रेल्वेगाडी दादरवरून सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. परंतु, विविध कारणे पुढे करीत या रेल्वेगाडीची फेरी दादरवरून सुरू करण्यासाठी चालढकल केली जात आहे. अशी परिस्थिती असताना, भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन नियमित दैनिक एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यास मंजुरी दिली.

आरएलडीएच्या कामाचा तेजस एक्स्प्रेसला फटका

रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने (आरएलडीए) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकासाची कामे हाती घेतली आहेत. परंतु, प्रकल्पाची कामे संथ गतीने सुरू असल्याने त्याचा फटका फटका प्रवाशांना बसत आहे. गेल्या सहा महिन्यांत ब्लॉकची मुदत सहा वेळा वाढवण्यात आली. या ब्लॉकची सुरुवात १ फेब्रुवारी २०२६ रोजी झाली होती. त्यानंतर त्याची मुदत अनुक्रमे २६ एप्रिल, १९ मे, १३ जून, ५ ऑगस्ट, २१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली. आता पुन्हा एकदा मुदतवाढ देत हा ब्लॉक ५ सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत गाडी क्रमांक १२८१० हावडा – सीएसएमटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२११२ अमरावती – सीएसएमटी एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक २२१२० मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांचा प्रवास दादर येथेच समाप्त होत आहे. तसेच गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू – सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणे स्थानकापर्यंतच धावत आहे.

नव्या गाडीला या स्थानकांत थांबे

या नवीन एक्स्प्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर व्यावसायिक थांबे देण्यात आले आहेत.