पनवेल-सीएसटी उन्नत मार्गाचे भवितव्य राज्य सरकारच्या हाती

पूर्व मुक्तमार्गाखाली पी. डी’मेलो मार्गाच्या मध्ये पहिल्या मजल्यावर हा उन्नत मुक्तमार्ग येणार आहे.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पनवेल-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस यांदरम्यान उन्नत रेल्वेमार्गाची घोषणा केली असली, तरी या प्रकल्पात राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पनवेल-सीएसटी उन्नत रेल्वेमार्गाच्या वाटेत राज्य सरकारचे अनेक प्रकल्प असल्याने या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल वारंवार बदलावा लागला आहे. त्यातच सिडकोनेही आपल्या क्षेत्रात मेट्रोचे नियोजन केल्याने सिडकोच्या हद्दीतून जाणाऱ्या मार्गाचा आराखडाही बदलावा लागणार आहे.

कुर्ला ते छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पामुळे या उन्नत मार्गात काहीच बदल होणार नसल्याचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी स्पष्ट केले. मात्र पी. डी’मेलो मार्गावर राज्य सरकारचे अनेक प्रकल्प येणार असून मानखुर्द येथे प्रस्तावित मेट्रोमुळेही उन्नत रेल्वेमार्गात बदल करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प मुख्यत्वे मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणार असल्याने राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईकरांसाठी प्रचंड फायद्याचा ठरलेला पूर्व मुक्तमार्ग थेट ऑरेंज गेटपर्यंत आणण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. पूर्व मुक्तमार्गाखाली पी. डी’मेलो मार्गाच्या मध्ये पहिल्या मजल्यावर हा उन्नत मुक्तमार्ग येणार आहे.

पी. डी’मेलो मार्गाच्या बाजूला असलेल्या मार्गावरून हार्बर मार्गाची मुख्य मार्गिका येणार आहे. ही मार्गिका डॉकयार्ड रोड स्थानकापासून पुढे आणण्याची योजना आहे. त्यासाठी मेन्शन रोडची निवड करण्यात आली असून ही मार्गिका मेन्शन रोडवरून उन्नत मार्गाने पुढे येणार आहे. याच भागातून एक मेट्रो प्रकल्पही आखण्यात आल्याने या प्रकल्पासाठी जागा कशी उपलब्ध होणार, याबाबत साशंकता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cst panvel new plan