पर्यटकांना छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इमारतीचे दर्शन घेण्याची सुविधा

‘स्वच्छ भारत अभियाना’चा एक भाग म्हणून आणि देशी-विदेशी पर्यटकांना पालिका मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या देखण्या इमारतीचे ‘याचि देही याचि डोळा’ दर्शन घेता यावे यासाठी पादचारी भुयारीमार्गावरील वाहतूक बेटावर उभारण्यात आलेल्या दर्शन गॅलरीचे गुरुवारी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे आता या दर्शन गॅलरीमधून पर्यटकांना छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि पालिका मुख्यालयाच्या इमारतीची छायाचित्रे टिपता येणार आहेत.

‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये देशभरातील दहा ठिकाणांचे सुशोभिकरण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्यामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसराचा समावेश आहे. त्यामुळे पालिकेने छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसराच्या सुशोभिकरणाची योजना हाती घेतली आहे. पालिका मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस समोरील मोठय़ा चौकामध्ये उभे राहून पर्यटक या दोन्ही पुरातन वास्तूचा उत्तम नमुना असलेल्या इमारतींची छायाचित्रे टिपत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. काही वेळा छोटे अपघातही घडले आहेत. ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि देशी-विदेशी पर्यटकांचा विचार करुन पालिकेने मुख्यालयासमोरील फिरोजशाह मेहता यांच्या पुतळ्यासमोर पादचारी भुयारी मार्गावरील वाहतूक बेटावर दर्शन गॅलरी उभारण्याचा निर्णय घेतला होता. या गॅलरीचे पालिका निवडणुकीपूर्वी लोकार्पण करण्याचा शिवसेनेचा विचार होता. मात्र पुरातन वास्तू समितीने गॅलरीच्या उंचीवर आक्षेप घेतल्यामुळे गॅलरीच्या कामात काही फेरबदल करावे लागले. पालिका निवडणुकीपूर्वी दर्शन गॅलरीचे लोकार्पण करता आले नाही.

भुयारी पादचारी मार्गातील वायुविजन यंत्रणा गॅलरीच्या आड येत होती. पालिकेने भुयारी मार्गातील वायुविजन यंत्रणेमध्ये काही फेरबदल करुन दर्शन गॅलरीसाठी जागा मोकळी करुन घेण्यात आली. छत्रपती टर्मिनस परिसराचे दर्शन घडविणाऱ्या या दर्शन गॅलरीचे गुरुवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे ९० लाख रुपये खर्च करुन ही दर्शन गॅलरी उभारण्यात आली आहे. आता पर्यटकांना सुरक्षितपणे दर्शन गॅलरीत उभे राहून पुरातन वास्त इमारतींचे ‘याचि देही याचि डोळा’ दर्शन घेत छायाचित्रे टिपता येणार आहेत.