मुंबई : फोर्ट मधील ‘ओल्ड कस्टम हाऊस’ या शासकीय इमारतीमध्ये कार्यरत असलेल्या ‘उर्दू साहित्य अकादमी’ला भाड्याच्या जागेत स्थलांतर होण्याचे आदेश सांस्कृतिक कार्य विभागाने दिले आहेत. सरकारी जागा सोडण्याचे आदेश मिळाल्याने अकादमी सुवर्ण महोत्सवी वर्षात रस्त्यावर आली आहे. उर्दू साहित्य अकादमीला सरकार सापत्न वागणूक देत असून स्थलांतर करण्याच्या आदेशाला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी विनंती समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अल्पसंख्याक विकास मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे केली आहे.

सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत आठ साहित्य अकादमी कार्यरत आहेत. त्यापैकी उर्दू साहित्य अकादमी एक आहे. सिंधी, हिंदी, गुजराती, संस्कृत, तेलगु, बंगाली, गोर बंजारा आदी साहित्य अकादमींना ‘ओल्ड कस्टम हाऊस’ इमारतीत सन्मानाने दालन वाटप करण्याचे विभागाचे नियोजन आहे. त्याचवेळी उर्दू साहित्य अकादमीला मात्र ३५ वर्षे असलेली जागा सोडून भाड्याची जागा शोधण्यास सांस्कृतिक कार्य विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी बजावले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्दू साहित्य अकादमीची स्थापना १९७५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी केली. चव्हाण हे उर्दू अकादमीचे पहिले अध्यक्ष राहिलेले आहेत. अकादमीचे कार्यालय १९९६ पासून ‘ओल्ड कस्टम हाऊस’मधील सांस्कृतिक कार्य विभागाच्या जागेमध्ये कार्यरत आहे. अकादमीला मागच्या वर्षी १६ लाख निधी प्राप्त झालेला आहे. मंत्रालय परिसरात भाड्याच्या जागेत अकादमी स्थलांतरीत केल्यास मिळणाऱ्या निधीच्या सहा पट आर्थिक तरतूद असली पाहिजे. त्यामुळे जायचे तर कुठे, असा प्रश्न अकादमीच्या कार्यकारी अधिकाऱ्यास पडला आहे.