मुंबई: देशात शेकडो वर्षापासून प्रचलित असलेल्या पारंपारिक गोंदणकलेचा समावेश कला शिक्षण अभ्यासक्रमात करण्यात यावा त्यासाठी प्रशासकीय पातळीवर तात्काळ पावले उचलावीत असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी प्रशासनाला दिले. गोंदणकलेच्या संदर्भातील सर्वंकष संशोधनासाठी एक अभ्यासगट स्थापन करण्यात यावा असेही त्यांनी सुचविले आहे.
राज्यातील पारंपारिक गोंदणकलाकारांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत शेलार यांनी हे निर्देश दिले. राज्यातील विविध भागात पारंपारिक गोंदणकला खूप प्राचीन काळापासून प्रचलित असून लोकसंस्कृतीचा एक भाग आहे. विवाह सोहळ्यांसह विविध उत्सवांमधे धार्मिक चिन्हे शरीरावर गोंदून घेण्याची परंपरा राज्यातील अनेक समाजांमधे प्रथा म्हणून पाळली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे या कलेवर परिणाम होत आहे. राज्याच्या सर्व भागात समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या पारंपारिक गोंदणकलेसंदर्भात सर्वंकष संशोधन होणे आवश्यक आहे, अशी भावना शेलार यांनी यावेळी व्यक्त केली. नवयुवकांमधे टाटू आर्टच्या माध्यमातून गोंदणकला लोकप्रिय आहे. गोंदणकलेमुळे हजारो नवयुवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. या कलेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या कलेविषयी संशोधन करून उच्च शिक्षण अभ्यासक्रमात गोंदणकलेचा समावेश केल्यास हजारो नवयुवकांना एक पारंपारिक कला आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून उपजीवीकेसाठी माध्यम होईल, असेही ते म्हणाले. यावेळी सांस्कृतिक कार्य उप सचिव महेश वाव्हळ, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, सह संचालक श्रीराम पांडे व गोंदणकलाकारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.