मुंबई : राज्याचे सांस्कृतिक वैभव प्रदर्शित करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्य वस्तुसंग्रहालय उभारण्यासंदर्भात मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुनगंटीवार म्हणाले, अनेक राज्यांनी त्यांच्या वस्तुसंग्रहालयात राज्याचा इतिहास, कला आणि संस्कृती दर्शविली आहे. महाराष्ट्रातही संग्रहालय उभारताना राज्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक इतिहास आणि प्रगती प्रतिबिंबित करण्यात येईल. अश्मयुगापासून ते आधुनिक काळापर्यंत महाराष्ट्र राज्याचा वैभवशाली प्रवास दाखवणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वस्तुसंग्रहालय स्थापन करण्यासाठी संचालनालयामार्फत कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात यावी. यासाठी बिहारसह देशातील सर्वोत्तम वस्तुसंग्रहालये आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी येथे भेट देणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 राज्यातील नियोजित वस्तुसंग्रहालयामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाचे महत्त्वाचे कालखंड-अश्मयुगीन, प्रागैतिहासिक काळ, ऐतिहासिक व मध्ययुगीन काळ, मराठा व ब्रिटिश कालखंड, महाराष्ट्रातील लोकजीवन व आदिवासी संस्कृती, स्वातंत्र्यलढा व संयुक्त महाराष्ट्र चळवळ, आधुनिक महाराष्ट्रासंबंधी विविध दालने उभारणार असून, यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. वस्तुसंग्रहालय उभारणीसाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असून त्यात पुरातत्त्वशास्त्र, वस्तुसंग्रहालय शास्त्र, इतिहास, संस्कृती, कला, विज्ञान, प्रशासन, वास्तू व स्थापत्यशास्त्र आदी विषयांतील १८ तज्ज्ञांचा समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cultural glory museum international standard sudhir mungantiwar ysh
First published on: 29-09-2022 at 00:02 IST