राज्यातील महामार्गावरून जाताना दोन ठिकाणांमधील अंतर वाहनाने किती वेळात पार केले, या माहितीच्या आधारे वाहनाचा वेग शोधून वेगमर्यादा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. पोलीस, सीसीटीव्ही किंवा वेगमोजणी यंत्रणा नसलेल्या टप्प्यात वाहनचालक बेदरकारपणे वाहने नेत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता अंतर आणि वेळ यांच्या गुणोत्तराचा आधार घेऊन पोलीस वेगमर्यादा तोडणाऱ्यांचा शोध घेणार आहेत.

अतिवेगाने, बेदरकारपणे वाहन चालवल्याने होणारे अपघात रोखण्यासोबत बेशिस्त वाहनचालकांना लगाम बसावा यासाठी महामार्गावर बसवण्यात आलेले सीसीटीव्ही, स्पीडगन यांच्या नोंदीच्या आधारे कारवाई करण्यात येते. त्यालाच आता या नव्या प्रकाराची जोड दिली जाणार आहे.  लवकरच याची अंमलबजावणी राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गावर करण्यात येणार असून सर्वप्रथम टोलनाक्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान (ठाणे परिक्षेत्र) यांनी दिली.

एखाद्या मार्गावर असलेल्या दोन टोल नाक्यादरम्यानचे अंतर आणि त्याला लागणारा प्रवास वेळ पाहिला जाईल. जर दोन टोल नाक्यादरम्यान एक तासाचे असलेले अंतर अर्धा तासांतच पार केले असेल, तर त्या वाहनाने वेग मर्यादेचे उल्लंघन केले हे निश्चितच होते, असे प्रधान म्हणाले. वाहनांच्या स्वयंचलित टोलवसुलीसाठी बसवण्यात आलेली फास्टॅग यंत्रणा याकामी उपयुक्त ठरणार आहे. या यंत्रणेच्या आधारे गाडीचा क्रमांक, टोलनाक्यावरील वेळ इत्यादी तपशील उपलब्ध होत असल्याने त्याआधारे वाहनाचा सरासरी वेग शोधून काढणेही शक्य होणार आहे. महामार्ग पोलिसांना वाहनचालकाची माहिती मिळताच त्याच्या मोबाइलवर वेगमर्यादेचे उल्लंघन के ल्याचा संदेश पाठविला जाईल व त्यात दंड, ती भरण्याची मुदत वगैरे माहिती दिलेली असेल. अशी माहिती मिळावी यासाठी एमएसआरडीसी, आयआरबी किं वा टोल कं पनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशीही संपर्क साधला जात असल्याचे प्रधान यांनी सांगितले.

महामार्गावर वेगमर्यादा ओलांडणाऱ्यांवर वचक

स्वयंचलित कॅमेऱ्यांचीही मदत

* महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचा क्रमांक टिपणाऱ्या ‘ऑटोमॅटिक नंबरप्लेट रिकग्निशन’ कॅमेरे बसवण्यात येत आहेत.

* महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असलेले हे काम टाळेबंदीमुळे रखडले आहे.

* लवकरच हे कॅमेरे बसवून कार्यान्वित करण्यात येईल व त्याआधारे बेशिस्त वाहनचालकांना शोधणे शक्य होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.